आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव यांनी भंडाफाेड करताच शेतकऱ्याचे 70 हजार कर्ज 3 तासांत माफ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- धारूर तालुक्यातील अंजनडाेहचे शेतकरी बाळासाहेब सोळंके यांना १५ महिन्यांपूर्वीच राज्य शासनाकडून कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळाले, पण कर्ज माफ झालेच नाही. बीडमधील सभेत उद्धव ठाकरे यांनी थेट सोळंकेंना व्यासपीठावर उभे करत सरकारने फसवणूक केल्याचा आरोप करत त्यांची कैफियत मांडली. यानंतर शासनदरबारी वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलली. अवघ्या तीनच तासांतच सोळंकेंच्या बँक खात्यात ७० हजारांची रक्कम कर्जातून वळती झाली. त्यांच्यावर ९८ हजारांचे कर्ज हाेते. ज्या कर्जमाफीला तीनच तास पुरले, ती १५ महिन्यांत का झाली नाही, असा प्रश्न यानंतर उपस्थित होत आहे. 

 

बाळासाहेब सोळंकेंकडे साडेसहा एकर जमीन आहे. वृद्ध आजी, आई, भावाचे कुटुंब, पत्नी, मुले असा परिवार आहे. २०१२ मध्ये सोळंके यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या धारूर शाखेतून खरिपासाठी ६८,८१४ रुपयांचे कर्ज घेतले. मात्र दुष्काळामुळे ते फेडता आले नाही. व्याजासह कर्जाची रक्कम ९८,९५० रुपये झाली. २०१७ मध्ये सरकारने शेतकरी कर्जमाफी दिली. २६ ऑक्टोबर २०१७ रोजी बीडमध्ये साेळंकेंना समारंभपूर्वक जिल्हाधिकारी व आमदारांच्या हस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले. १५ महिने उलटूनही कर्जमाफीच्या ग्रीन लिस्टमध्ये नाव नसल्याने सोळंकेंनी बँक अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी, उपनिबंधक कार्यालयात अनेकदा खेटे मारले. 

 

अर्ज करताना झाली होती चूक : 
बँक सोळंके हे कर्जमाफीसाठी पात्र असल्याचे कळवले होते. त्यामुळे त्यांना प्रमाणपत्र मिळाले. मात्र ऑनलाइन अर्ज करताना साेळंके यांच्याकडून खाते क्रमांक चुकीचा टाकलेला होता, असे धारूरचे एसबीआय शाखा व्यवस्थापक मिलिंद रोटे यांनी सांगितले. 

 

सभेनंतर अशी हलली सूत्रे : 
दुपारी २ ला सभा संपल्यानंतर सायंकाळी ५:३० वाजता एसबीआयच्या वरिष्ठ कार्यालयातून धारूर शाखेत फोन गेला. सोळंके यांच्यावरील थकीत कर्जापैकी ७० हजार रुपये माफ झाले आहेत. तशी नोंद त्यांच्या खात्यावर केली गेली असल्याचे सांगण्यात आल्याची माहिती रोटेंनी दिली. 

 

रक्कम नोव्हेंबरमध्येच बँकेकडे दिली : मंत्री 
सरकारने सोळंके यांच्या कर्जमाफीचे पैसे नोव्हेंबर २०१८ मध्येच स्टेट बँकेला दिलेे असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. ते म्हणाले, 'कर्ज थकल्याने सोळंकेंचे बँक खाते एनपीए झाले होते. ते बँकिंग नेटवर्कमध्ये आणण्यासाठी सरकारने ५८,४९३ रुपयांचे योगदान दिले. हे खाते पुन्हा नव्याने सुरू होऊ शकेल. ही रक्कम बँकेला दिली असली तरी खात्याबाबतच्या करारानुसार त्यांचे ९८,६८७ रुपयांचे कर्ज माफ झालेे आहे.' 
 

 

बातम्या आणखी आहेत...