आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाव्हाणे शिवारात गिरणा नदीपात्रात वाळूमाफियाच्या डंपरने वृद्ध शेतकऱ्याला चिरडले; जमावाची जाळपाेळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारातील गिरणा नदीपात्रात वाळू व्यावसायिकांनी तयार केलेल्या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वडनगरीच्या वृद्धाला भरधाव डंपरने चिरडले. ही घटना शुक्रवारी दुपारी १.२० वाजता घडली. या अपघातानंतर संतप्त जमावाने डंपरची तोडफोड करून ताे पेटवून दिला. जळगाव येथील तहसीलदारांवर हप्तेखोरीचा आरोप करत तहसीलदार घटनास्थळी आल्याशिवाय मृतदेह उचलणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली. त्यामुळे तब्बल चार तास मृतदेह नदीपात्रात पडून होता. शेवटी पोलिसांच्या आश्वासनानंतर सायंकाळी ५.३० वाजता मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. 


पुंडलीक कौतिक पाटील (वय ६५, रा. वडनगरी, ता. जळगाव) असे मृत वृद्धाचे नाव आहे. पुंडलीक पाटील हे सकाळी गिरणा नदीकाठालगत त्यांच्या शेताच्या शेजारीच गुरे चारत होते. नदीपात्रात वाळू व्यावसायिकांनी तयार केलेल्या रस्त्याच्या कडेला ते बसलेले होते. दुपारी १ वाजून २० मिनिटांनी वाळू उपसा करण्यासाठी डंपर(एम.एच.१९, झेड ७५९०) नदी पात्रात चालला होता. त्याचवेळी समोरून वाळू उत्खनन करून एक डंपर आव्हाणे शिवाराकडे येत होता. या वेळी नदी पात्राकडे जात असलेल्या डंपरने पाटील यांना धडक दिली. त्यानंतर समोरून येणाऱ्या डंपरला रस्ता देण्यासाठी पुन्हा डंपरचा रिव्हर्स गिअर टाकल्यामुळे दुसऱ्यांदा पाटील यांच्या अंगावरून डंपर गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर डंपरचालक शेतांकडे पळत सुटला. तर शेतात असलेल्या महिलांनी चालकाला विचारले असता, माझ्या डंपरखाली म्हैस मेल्याचे सांगून त्याने पळ काढला. तर ही घटना पाहणारे प्रकाश चौधरी, रमण पाटील, भास्कर पाटील यांनी धाव घेत नदी पात्र गाठले. त्यानंतर वडनगरीचे ग्रामस्थ घटनास्थळी पाेहचले. दरम्यान, या प्रकाराने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी डंपरची तोडफोड केली. त्यानंतर डंपरला पेटवून दिले. जमाव आक्रमक झाल्यामुळे जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक सागर शिंपी, रामानंदनगर व तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी, दंगा काबू पथक असा माेठा फाैजफाटा घटनास्थळी दाखल झाला. 


अखेर तहसीलदार जिल्हा रुग्णालयात 
सायंकाळी ६ वाजता पोलिस उपअधीक्षक सांगळे यांनी पोलिस संरक्षणात जळगावचे तहसीलदार अमोल निकम यांना जिल्हा रुग्णालयात आणले. त्या वेळी नातेवाइकांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केला. मी कारवाई करीत आहे. गुरुवारीच एक डंपर पकडला. तहसील कार्यालयात पकडलेली वाहने लावण्यात आलेली आहेत. ती माझी हद्द नसल्याने तेथे आलो नसल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांनी मृताच्या नातेवाइकांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. प्रशासन मदत देऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील हे जिल्हा रुग्णालयात उपस्थित हाेते. त्यांनी नातेवाइकांची समजूत काढली. नातेवाइकांनी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली. त्या दृष्टिकोनातून तडजोड सुरू होती. पोलिस उपअधीक्षक सांगळे, तहसीलदार निकम तसेच पोलिस अधिकारी जिल्हा रुग्णालयात थांबून होते. तोपर्यंत मृतदेह वाहनातच होता. शेवटी रात्री ८ वाजेनंतर तडजोड झाली. त्यानंतर शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


रस्ता उद‌्ध्वस्त करा 
वाळू व्यावसायिकांनी गिरणा नदीपात्रात तयार केलेला रस्ता उद‌्ध्वस्त करण्यात यावा. वडगाव, खेडीमार्गे सुरू असलेली वाळू वाहतूक बंद करण्यात यावी अन्यथा, ग्रामस्थ कायदा हातात घेतील, असा इशाराही देण्यात आला. प्रशासन अजून किती बळींची वाट पाहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा कर्तव्यदक्षपणा येथेही दाखवावा,असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. नदी पात्रात ठिकठिकाणी वाळू व्यावसायिकांनी लक्ष ठेवण्यासाठी जणू चौक्याच उभारलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी १० ते १५ जण घोळक्याने बसलेले असतात. तेथे दारूचीही व्यवस्था करण्यात येते. अगदी १५ ते १६ वर्षांची मुले दारू पिऊन डंपर चालवत असल्याचेही सांगण्यात अाले. 


जमावाचा राेष तहसीलदारांवर 
पाटील यांचे नातेवाईक व वडनगरीचे ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झालेले होते. वाळू गटाचे ठेकेदार, चालक आणि तहसीलदार निकम यांना येथे आणा. हप्ते घेणाऱ्या तहसीलदाराबरोबर चालक व ठेकेदारालाही अाम्ही साेडणार नाहीत, असा इशारा नातेवाईक व ग्रामस्थांनी दिला. त्या वेळी मृतदेह नदीपात्रातच होता. पाटील यांच्या मृतदेहाभोवती त्यांचा मुलगा राजेंद्र, मुलगी शोभा पाटील, कौशल्या पाटील व संगीता पाटील यांच्यासह नातेवाईक बसलेले होते. तहसीलदार, ठेकेदार व चालकाला येथे आणा, त्याशिवाय मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली होती. ग्रामपंचायत व राजकारणीही वाळू वाल्यांकडून पैसे घेतात, असा आरोपही काही ग्रामस्थांनी केला. 


महसूलचे अधिकारी न आल्याने जमावाचा वाढला संताप 
दुपारी १.३० वाजेपासून मृतदेह नदी पात्रातच पडून होता. धरणगाव व जळगाव येथील तहसीलदार व तलाठीही घटनास्थळी न फिरकल्याने ग्रामस्थ अधिकच संतप्त झाले हाेते. ग्रामस्थांचा संताप वाढत असताना पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे हे दुपारी ४ वाजेच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाटील यांच्या नातेवाइकांशी संवाद साधला. नातेवाइकांनी तहसीलदारांना येथे बोलवा, त्यांना आम्हाला जाब विचारायचा आहे. त्याचबरोबर ठेकेदार व चालकालाही येथे आणा, अशी त्यांच्याकडे मागणी केली. सांगळे यांनी तहसीलदार येथे येणार नसल्याचे सांगितले. चालकासह ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तो सहज सुटणार नाही, असा खटला दाखल करण्यात यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. तर येथेच फिर्याद घेतो, असे म्हणत सांगळे यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाइकांची मागणी मान्य केली. त्यानंतर तब्बल ४ तासांनंतर सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास एका खासगी वाहनात मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. 


जळगाव-धरणगाव हद्दीचा वाद 
जमावाने प्रारंभी धरणगावचे तहसीलदार चंद्रजित राजपूत व जळगावचे तहसीलदार अमोल निकम यांना मोबाइलद्वारे संपर्क साधून घटनेबाबत माहिती दिली. मात्र, दोन्ही तहसीलदारांनी ती आमची हद्द नसल्याचे ग्रामस्थांना सांगितले. मुळात लिलाव झालेला दोनगाव हा वाळू गट धरणगाव तहसील कार्यालयाच्या हद्दीत येताे. अपघात जळगाव तहसील कार्यालयाच्या हद्दीत घडला आहे. तर दोन्ही तहसीलदारांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, नदीपात्रात शेकडाे डंपर मुरूम टाकून वाळू तस्करीसाठी रस्ता तयार करण्यात अाला अाहे. दिवसाढवळ्या तेथून तस्करी हाेत असतानाही महसूल प्रशासन मूग गिळून गप्प असल्याने राेष वाढला. 


पंटरांमार्फत घेतले जातात हप्ते 
जळगावचे तहसीलदार हे पंटरांमार्फत वाळूमाफियांकडून हप्ते घेतात, असा अाराेप जमावाने केला. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात ते सायंकाळी पाेलिस बंदाेबस्तात अाले. जमावाने त्यांना घेरल्याने ते प्रसार माध्यमांसमाेर अाराेपांचे खंडन करू शकले नाहीत. 'दिव्य मराठी'ने रात्री १ वाजेपर्यंत भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून त्यांची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ताे हाेऊ शकला नाही. 

बातम्या आणखी आहेत...