आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण, कर्जावरून मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नामपूर- उत्राणे (ता. बागलाण) येथील अविवाहित दिव्यांग तरुण शेतकरी प्रवीण कडू पगार (३५) यांनी कर्जासाठी बँक उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने तसेच मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे याबाबत थेट मुख्यमंत्र्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून गावातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. महसूल अधिकारी घटनास्थळी येत नाही तोपर्यंत विहिरीतील मृतदेह काढणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महसूल अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शासन जोपर्यंत प्रवीण यांच्या कुटुंबास न्याय देत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन जिल्ह्यात झालेली ही पहिली आत्महत्या आहे. 


प्रवीण यांनी उत्राणेतील शेती विकून बेहेड (ता. साक्री) येथे तीन वर्षांपूर्वी शेती घेतली. म्हसदी येथील एका बँकेतून शेतीसाठी कर्ज घेण्यासाठी ते हेलपाटे मारत होते. बँक शाखाधिकाऱ्यांनी त्यांना कर्ज देण्याचे आश्वासन दिले होते. कर्ज काढून शेतीपूरक व्यवसाय करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. मात्र नंतर शाखाधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप त्यांनी केला असून, सहा महिन्यांपासून हेलपाटे मारूनही पदरी निराशा आल्याने याबाबत थेट मुख्यमंत्री, सहकारमंत्री, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री, पालकमंत्र्यांनाही फोन केल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. फोन करूनही पदरात निराशाच पडल्याने त्यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास गावाजवळील पुंजाराम पगार यांच्या मालकीच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

बातम्या आणखी आहेत...