कष्टातून उत्पादन वाढवले, / कष्टातून उत्पादन वाढवले, कर्जही फेडले ... आता मदतीसाठी पुढाकार

दीप्ती राऊत

Jan 01,2019 10:58:00 AM IST

नाशिक - शेतीतील आर्थिक संकटाचा सामना करताना वैफल्य अाल्याने पतीने मृत्यूला कवटाळले. त्याच्या पश्चात परिस्थितीशी झगडत शेती आणि संसार सावरत पुन्हा उभ्या राहिलेल्या शेतकरी विधवांनी अापल्या जीवनात अामूलाग्र बदल घडवला. ही किमया घडली आहे बायफ मित्र संस्थेच्या नवजीवन प्रकल्पांतर्गत नाशिक जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांसोबत केलेल्या कामामुळे... या कुटुंबांना संस्थेने एक एकर फळबाग उभी करण्यासाठी दोन वर्षांची तांत्रिक आणि आर्थिक मदत केली, त्याअाधारे आता महिला यशस्वी शेतकरी म्हणून सन्मानाने उभ्या राहिल्या आहेत. आपल्यावर जी वेळ आली ती अन्य कुणावरही नको या भावनेतून आता त्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आपल्या उत्पन्नातील फूल ना फुलाची पाकळी देऊ इच्छितात.

नाशिकपासून ४२ किलोमीटर अंतरावरील सोनेवाडीतील ताराबाई फडोळ ट्रॅक्टरवरूनच द्राक्षाच्या मळ्यातून परत आल्या होत्या. १२ लाखांचा कर्जाचा बोजा सहन न झाल्याने त्यांच्या पतीने तीन वर्षांपूर्वी आत्महत्या केली. त्यात गावातील शनिमंदिराच्या वर्गणीसाठी काढलेले ३९ हजार, नातलगांकडून उसनेे घेतलेले ६ लाख आणि सर्व बँकांचे कर्ज ६ लाख. दु:खाच्या गर्तेत अडकलेल्या ताराबाईंना 'बायफ मित्र' संस्थेच्या प्रकल्पाची माहिती मिळाली. त्यांनी स्वत:च्या अर्धवट पडलेल्या द्राक्षबागेच्या अँगलसाठी मदत मागितली. ताराबाईंची तळमळ बघून संस्थेने त्यांचे नियम शिथिल करून त्यांना मदत केली. दोन वर्षे संस्थेच्या कृषितज्ज्ञांचा सल्ला ताराबाईंनी तंतोतंंत पाळला. मजुरी परवडत नाही म्हणून मुलांसह स्वत: रात्रीचा दिवस करून बाग फुलवली. मजूर येत नव्हते तेव्हा घरातलं धान्य विकून त्यांना आगाऊ पैसे दिले. कांद्याचे भाव पडले तेव्हा त्याचं बियाणं करून घरच्या घरी लागवड केली. त्यातून आलेला पै न पै साठवून पतीचे ५ लाखांचे कर्ज फेडले. प्रचंड कष्ट, व्यावहारिक निर्णय आणि परिस्थितीचा सामना करण्याची चिकाटी व जिद्द या जोरावर ताराबाईंनी गेल्या वर्षीचे उत्पादन सातपटीने वाढवत आज १५५ क्विंटल द्राक्षे पिकवली. यातील १ क्विंटलचे उत्पन्न त्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार आहेत.

टंचाईच्या काळात घामावर पिकवल्या फळबागा
येवला तालुक्यातील मनीषा भगत यांच्या पदरात दाेन लेकरं टाकून त्यांच्या पतीने अात्महत्या केली. मनीषाच्या डोईवर आभाळ कोसळलं होतं. पण नवजीवन प्रकल्पांतर्गत त्यांना डाळिंब बागेसाठी मदत मिळाली. कमी पाण्यातील खात्रीशीर उत्पन्न देणाऱ्या डाळिंबाच्या बागेत त्यांनीही मेहनत घेतली. सध्या टंचाईमुळे आजूबाजूच्या बागा सुकलेल्या असताना मनीषाताईंची बाग मात्र आंबेबहराने बहरली. गेेल्या वर्षीचे ७ हजारांचे उत्पन्न त्यांनी यंदा ७० हजारांवर नेले आहे. त्यादेखील या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी त्यांचा खारीचा वाटा देणार आहेत.


'बायफ मित्रा'चे दोन वर्षांचे 'नवजीवन'
- २०१६-१७ मधील नाशिक जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांची यादी मिळवली.
- प्रत्येकाच्या घरी जाऊन फळबाग विकसित करण्याच्या उपक्रमाची माहिती दिली
- जमिनीचा पोत, पाण्याची उपलब्धता, स्थानिक पिकांची माहिती घेतली
- त्यांच्या जमिनीपैकी एक एकर जमिनीवर फळबाग तयार करण्यासाठी मदत देऊ केली
- त्यात डाळिंब, शेवगा, अॅपल बोर आणि लिंबू हे प्रस्ताव ठेवले
- महिलांनी त्यांच्या स्थानिक परिस्थितीनुसार पिकाची निवड केली
- रोपे, खते, औषधे आणि कृषी सल्ला
- जिथे पाणी नव्हते तिथे पाण्याची सोय केली
- प्रती कुटुंब १ लाख मदत देण्यात आली

रेडगावच्या लंकाबाई काळेंनी या प्रकल्पांतर्गत शेवग्याची शेती केली. त्यात सोयाबीन, कांदा यांचं अंतरपीकही लावलं. आता निर्यातक्षम शेवगा लावण्याचा त्यांचा विचार आहे. सध्याच्या दुष्काळात त्यांच्या कुटुंबासाठी पिण्यासाठी दर महिन्याला ३ हजार रुपयांचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. पण एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत त्याही यात सहभागी होणार आहेत.

शब्दाच्या आधाराची पुण्याई
आमच्यावर कटू प्रसंग ओढवला तेव्हा मलाही आत्महत्या करावीशी वाटत होती. पण त्या वेळी दादांच्या या कामाची मदत मिळाली आणि आपल्यालाही कुणीतरी विचारतंय या भावनेनं चार हत्तींचं बळ आलं. त्यांच्या शब्दाचा आधार आम्हाला पुन्हा उभं राहण्यासाठी खूप मोठा ठरला. गेल्या वर्षी भाव पडले. हीच आधाराची पुण्याई इतर संकटग्रस्तांच्याही वाट्याला यावी यासाठी आम्ही हा सहभाग देत आहोत. - ताराबाई फडोळ, निफाड

पैशापेक्षा मानसिक मदत महत्त्वाची
तीन वर्षांपूर्वी एका सरकारी अधिकाऱ्यांनी मला एका कार्यक्रमाला बोलावले. त्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवांना गहू, तांदूळ अशी काहीतरी मदत करण्यात आली. तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला, काहीतरी बिनसतंय. त्याचे उत्तर शेतीतच शोधले पाहिजे. थेट पैशाची मदत दिली नाही, पण मानसिक आधारापासून तांत्रिक सहकार्यापर्यंत सारे पुरवले. या महिला स्वत:च्या पायावर सन्मानाने उभ्या अाहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करीत या यशस्वी मॉडेलच्या मुकुटात शिरपेच रोवला आहे. विनायक पाटील, विश्वस्त, बायफ मित्र संंस्था

अशी वेळ येऊ नये म्हणून
शेतकऱ्यांच्या आत्महत्या पूर्णपणे बंद व्हायला हव्यात. त्यांच्या पश्चात कुटुंबाचे काय हाल होतात याचा त्यांनी विचार करावा. त्यातून आम्ही गेलो. पण 'बायफ मित्रा' संस्था होती म्हणून आज हिरवीगार बाग दिसतेय. नाहीतर ज्वारी, बाजरीच्या पलीकडे आम्ही तिसऱ्या पिकाचा विचार केला नसता. आमच्यावर जी वेळ आली ती दुसऱ्या कुणावर येऊ नये असं वाटतं म्हणून ही फुलाची पाकळी. त्यामुळे आम्ही मदत करण्याचे ठरवले. - मनीषा भगत, येवला

X
COMMENT