शेतकऱ्याची 5 एकरातील माेसंबीची 700 झाडे पूर्ववैमनस्यातून ताेडली

गावाच्या हाकेच्या अंतरावर शेत, तरीही कुणी झाडे तोडली हा अनुत्तरित प्रश्न

दिव्य मराठी

Apr 23,2019 09:42:00 AM IST

वडीगोद्री - दुष्काळात तळहाताच्या फाेडाप्रमाणे दोन वर्षांपासून जपलेल्या पाच एकरातील मोसंबी बागेतील सातशे झाडे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने वैमनस्यातून ताेडून टाकल्याचा प्रकार अंबड तालुक्यातील दाढेगाव शिवारात रविवारी रात्री घडला. पाच एकरातील मोठ्या प्रमाणात असलेल्या कलमा कापण्यासाठी बराच वेळ लागतो. यादरम्यान हा प्रकार कुणाच्या नजरेस का पडला नाही, असा संशय व्यक्त केला जात आहे.


अंबड तालुक्यातील दाढेगाव शिवारात शेतकरी उमेश गव्हाणे यांनी पाच दोन वर्षांपूर्वी ७५० मोसंबीच्या कलमा लावल्या. मागील दोन वर्षांतील पावसाचे प्रमाण लक्षात घेता पाण्याचे नियोजन करून हाताच्या फोडाप्रमाणे शेतकऱ्याने या कलमा जगवल्या. यासाठी त्यांनी ठिबक सिंचन करून कलमांना पाण्याचे नियोजन केले. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीतही त्यांनी पाण्याचे नियोजन केले. दरम्यान, दोन वर्षांत दोन ते अडीच फुटापर्यंत वाढ झालेल्या कलमा या २१ एप्रिलच्या मध्यरात्री अज्ञात वक्तीने विळ्याने कापून टाकल्या. या पिकाला पाण्यासाठी ठिबक तसेच त्यासाठी खते, औषधी देण्यासाठी तयार केलेल्या व्हेंच्युरीचीही तोडफाेड केली. दरम्यान, उमेश गव्हाणे हे सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास झाडांना पाणी देण्यासाठी गेले असता शेतातील संपूर्ण झाडे जमीनदोस्त झालेले दिसल्यामुळे शेतकऱ्याने आई-वडिलांना या बाबत माहिती दिली. या प्रकरणी उमेश गव्हाणे याच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


महिनाभरापूर्वी स्टार्टरची चोरी : महिणाभरापूर्वी उमेश गव्हाणे यांच्या शेतातील विद्युत पंपाचे स्टार्टर चोरीला गेले होते. या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र, गोंदी पोलिसांकडून कोणताच तपास झाला नाही. या प्रकाराला एक महिना उलटल्यानंतर मोसंबीची झाडे कापल्याचा प्रकार झाला आहे. कुण्यातरी अज्ञाताने हा प्रकार केला आहे. दोन वर्षांच्या मेहनतीवर या घटनेमुळे पाणी पसरले आहे. पाेलिसांनी यापूर्वीच लक्ष दिले असते तर ही समस्या निर्माण झाली नसती, असे शेतकरी उमेश गव्हाणे यांनी सांगितले.


गावाच्या हाकेच्या अंतरावर शेत, तरीही कुणी झाडे तोडली हा अनुत्तरित प्रश्न
सदरील शेत गावाच्या हाकेच्या अंतरावर असून दोन वर्षांपासून लागवड केलेल्या झाडांची खोडे हे मजबूत आणि दीड ते दोन फुटांची उंचीही वाढली. सातशे झाडे तोडण्यासाठी एका किंवा दोन व्यक्तीला तीन ते चार तासांचा वेळ लागू शकतो. इतका वेळ हा प्रकार सुरू असताना शेताच्या शिवारात याची कुणालाच कुणकुण कशी लागली नाही, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

X