आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावरील मोकाट जनावरांना पकडून शेतकऱ्यांचे आंदोलन; भर उन्हात शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साडेतीन तास ठिय्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - हजारावर जनावरे असतानाही प्रशासनाकडून चारा छावणीला मंजूरी दिली जात नसल्याने पशूपालकांनी जनावरांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी सकाळी चार वाहनातून जनावरे उस्मानाबादच्या दिशेने आणली जात होती. मात्र, माहिती मिळताच चार ठाण्याच्या अंतर्गत पोलिसांनी ३० जनावरे ताब्यात घेतली. मात्र, उस्मानाबादेत मोकाट फिरणाऱ्या जनावरांना पकडून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मेार्चा काढला आणि छावणीच्या मंजूरीसाठी सोडतीन तास ठिय्या दिला.विशेष म्हणजे भर उन्हात शेतकऱ्यांचे हे आंदोलन सुरू असताना पोलिसांनीच शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय केली.

कळंब तालुक्यातील दहिफळ येथे सुरू असलेल्या चारा छावणीत एक हजारावर जनावरे असतानाही जिल्हा प्रशासनाकडून मान्यता देण्यात येत नसल्याने संतप्त पशुपालकांनी सोमवारी (दि.२६) जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांसह मोर्चाचे आयोजन केले होते. परंतु, याची कुणकुण लागताच पोलिसांनी जागाेजागी वाहने अडवून जनावरे शहरात दाखल होण्यापासून रोखली. यावरून बराच वेळ गदारोळही झाला. अखेर पायी मोर्चाने निघालेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिस मुख्यालयाजवळ आयतीच मोकाट जनावरे मिळाली. त्यांनी तातडीने धरपकड करून यातील सापडलेली दोन जनावरे समोर घेत अखेर आपला मोर्चा यशस्वी केला.

पानगांव, दहिफळ, अवधूतवाडी, तांदुळवाडी, दुधाळवाडी, साेंदणा, परतापूर अशा आठ ते दहा गावातील पशुधनासाठी दहिफळ येथे १८ जुलै २०१९ पासून चारा छावणी सुरू आहे. सदरील छावणीची कळंब तहसीलदारांनी २० जुलै रोजी पाहणी करून पंचनामाही केला. मात्र, छावणीला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. 
 

अशी केली अडवणूक  
येरमाळा पोलिसांनी मलकापूर पाटीजवळ एक वाहन अडवले. येडशी औटपोष्ट पोलिसांनी एक, ग्रामीण पोलिसांनी एक तर  शहरात दाखल झालेले शेवटचे वाहन सेंट्रल बिल्डिंगजवळ वाहतूक शाखेने अडवले. नंतर   सेंट्रल बिल्डींगपासून पशुपालकांनी  जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढला.  पोलिस मुख्यालयासमोर  समोर मोकाट जनावरांचा झुंड दिसला. ही जनावरे शेतकऱ्यांनी पकडली.
 

खासदार ओमराजेंची जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा
तब्बल साडेतीन तास पशुपालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जनावरांसह ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाबाबत माहिती मिळाल्यावर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील आदी आंदोलनस्थळी आले. त्यांनी पशुपालकांच्या निवडक प्रतिनिधींना सोबत घेऊन जिल्हाधिकारी यांची भेट घेत अडचण सांगितली. यावेळी चर्चेअंती जिल्हाधिकारी यांनी शासनाचे ३१ ऑगस्टपर्यंत छावणी सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. वाढीव मूदत आल्यास छावणीस मंजूरी देण्यात येईल अन्यथा सदरची जनावरे  येरमाळा येथील छावणीत दाखल करा असा तोडगा निघाल्याचे खासदार ओमराजे यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...