आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दादर बाजारपेठेत झेंडू फुलला; चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे दुष्काळात होतेय चांगले अर्थार्जन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पापरी - काळ्या शेतातील "पिवळं सोनं" दादर येथील बाजार पेठेत "भाव" खाऊन ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावत आहे. पापरी परिसरातील झेंडू उत्पादक शेतकरीवर्ग झेंडू फुलास बाजार पेठेत दर योग्य मिळत असल्याने आनंदीत आहेत. गेल्या 15 दिवसांपासून पापरी परिसरातून टेम्पो द्वारे मुंबई (दादर) मार्केटला दररोज दीड ते 2 हजार क्रेट म्हणजे 15 ते 20 हजार किलो झेंडू फुले विक्रीसाठी रवाना होत आहेत.

आगामी काळात येणाऱ्या श्रावण मासाच्या निमित्ताने झेंडू फुलास मागणी व बाजार पेठेत दर चांगला राहून आर्थिक उत्पादन चांगले होईल या हिशोबाने पापरी, खंडाळी, कोन्हेरी देवड़ी परिसरातील शेतकऱ्यांनी झेंडू पिक लागवड केली होती, या परिसरात सुमारे 70 ते 80 एकर क्षेत्रावर झेंडू पिकाचे लागवड आहे.
 
दरवर्षी पापरी परिसरात 125 ते 150 एकरावर झेंडूच्या लागवडी असतात यावर्षी दुष्काळ असल्याने ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरला उपलब्ध पाणी आहे त्याचे नियोजन करत लागवडी केल्या असल्याने प्रमाण घटले आहे. लागवडी झेंडू रोपे ही सातारा, सांगली परिसरातील रोप वाटिके मधून येतात. पापरी परिसरात "पापरी ते दादर" असा दररोज तरकारी, भाजीपाला, फळे, वाहतूक करणारे टेम्पो धारक स्वतः पदर पैशांची गुंतवणूक करत शेतकऱ्यांना लागवडी साठी रोपे उपलब्ध करून देत असतात.   
 
गेल्या 2 वर्षापासून झेंडू पिकाच्या नवीन वाणाच्या फुलास ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेवून जुन्या वाणाची लागवड कमी करत नवीन वाण निवडले असल्याचे फूलउत्पादकांकडून समजते. पूर्वी गोल्ड स्पॉट टू या वाणास व्यापाऱ्यांची बाजार पेठेत मागणी असायची आता ड्रीम येलो, पीतांबर, आसता, अष्टगंधा या नवीन वाणास त्यांची मागणी आहे.

सध्या 40 ते 55 रु प्रतिकिलो असा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. झेंडू फुलाची मोठी बाजारपेठ दादर येथे असल्याने माल(फुले) बाजार पेठेत लवकर पोहचण्यासाठी महिला मजुरांकडून सकाळच्या प्रहरीच तोडणी करावी लागते. एक महिला मजूर साधारणतः 55 ते 60 किलो झेंडू फुले तोड़ते. दुपारी 3 वाजल्या पासून वाहन चालक माल नेण्यासाठी शेतावर येतात. पापरी परिसर भाजीपाला, तरकारी, फळे पिकाविन्यासाठी प्रसिद्ध आहे येथून पिकअप, छोटा हत्ती, टेम्पो आदि छोटी मोठी 7, 8 वाहने दररोज सोलापूर, पुणे, नगर, गुलबर्गा, दादर आदि बाजार पेठेत रवाना होत असतात. सध्या भाजीपाल्यापेक्षा झेंडू फुले घेवून मोठे टेम्पो रवाना होत आहेत. झेंडू फुलाचे एक क्रेट 10 किलो चे असते, त्यास दादर येथील बाजार पेठेत नेण्यासाठी शेतकऱ्यांना सात रुपये प्रतिकिलो प्रमाणे भाडे द्यावे लागते आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीत शेतकरी कमी वेळेत कमी पाण्यात निघणारी झेंडूसारखी पिके घेत असून, सध्या झेंडू शेतकऱ्यांना चांगला आर्थिक आधार देत आहे.
 

बाजारात योग्य दर मिळत असल्याचे दुष्काळात हातभार
माझी सध्या जुनी नवी व्हरायटी मिळून 5 एकरावर झेंडू पिक आहे. दोन दिवसाआड तोडा करतो. 230 ते 150 क्रेट माल निघतो. दुष्काळामुळे बोअरचे पाणी कमी झाले आहे. उपलब्ध पाण्याचे नियोजन करत हा 5 एकर झेंडू जोपासला आहे. सध्या बाजार पेठेत योग्य दर मिळत असल्याने दुष्काळात चांगला आर्थिक हातभार लागत आहे. 50 रु प्रतिकिलो दर मिळाला तर एका क्रेट चे 500 रु होतात. महिला मजूर, टेम्पो भाडे आदि खर्च वजा करता कॅरेट मागे 350 रु आर्थिक लाभ होतो.
 - महादेव भोसले (झेंडू उत्पादक शेतकरी पापरी)