आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सापशिड्यांचा खेळ खेळून शेतकरी टाळताहेत तणाव; शेतातच औषधांच्या 'सुरक्षा पेट्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाफराबाद तालुक्यातील शिराळा येथील शेतकऱ्यांना सुरक्षा पेटी व उपचार किटचे प्रात्यक्षिक दाखविताना समन्वयक. - Divya Marathi
जाफराबाद तालुक्यातील शिराळा येथील शेतकऱ्यांना सुरक्षा पेटी व उपचार किटचे प्रात्यक्षिक दाखविताना समन्वयक.

जालना : नवे कपडे घेऊ नका, काही खायाला देऊ नका, पाणी पिऊन दिवाळी करू नं बाबा, जहर खाऊ नका, आम्ही आहे साथीला सोन्याची शेती, घाम गाळून पिकवू मोती, घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका, तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा... जहर खाऊ नका...

शेतकऱ्यांप्रति असलेली ही कविता चांगलीच प्रसिद्ध झालेली आहे. याच कवितेच्या प्रेरणेतून कार्ड या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकारातून फवारणीनंतर काय काळजी घ्यावी तसेच तणावमुक्तीसाठी असलेल्या सापशिड्यांचा खेळ खेळण्यासाठी चार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा तणाव कमी करीत आरोग्याची सुरक्षा याबाबत जागरूकता केली जात आहे. फवारणी झाल्यानंतर राहिलेली औषधी घरी न नेता ती शेतात केलेल्या पेट्यांमध्ये ठेवून आत्महत्या रोखून शेतकऱ्यांचा तणाव कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणामुळे अनेक शेतकऱ्यांत नैराश्य येते. दरम्यान, जालना जिल्ह्यात दहा महिन्यांतील ३१४ दिवसांत तणावाखाली असलेल्या तब्बल ८८ शेतकऱ्यांनी विषारी औषध प्राशन, गळफास, विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्या आहेत. अजूनही जिल्ह्यात २ लाख २७ हजार शेतकऱ्यांकडे चौदाशे कोटी रुपयांचे अजूनही कर्ज आहे. यामुळे शेतकरी तणावाखाली राहू नये म्हणून सिजेंटा इंडिया, पुणे व कार्ड या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कृषी व्यवसायाशी निगडित असलेले कामगार यांच्यात आरोग्य, सुरक्षा, पर्यावरण संरक्षण करण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम जालना, बुलडाणा, औरंगाबाद, वाशीम जिल्ह्यातील ७५ गावांमध्ये प्राथमिक स्तरावर राबवण्यात येत आहे. किटक औषधांची हाताळणी कशी करावी, प्रथमोपचार पेटी, विषबाधा झाल्यास काय काळजी घ्यावी याबाबत माहिती दिल्या जात आहेत. या आगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी व्यवस्थापक पुष्कराज तायडे, अर्पणा खरात, अपेक्षा डांेगरे, माया घाेरपडे यांच्यासह आदी परिश्रम घेत आहेत.

जालना, बुलडाणा, औरंगाबाद, वाशीम जिल्ह्यांतील ७५ गावांत राबवला उपक्रम, जालना जिल्ह्यात सव्वादोन लाख शेतकऱ्यांवर चौदाशे कोटी रुपयांचे कर्ज

फवारणीवर जास्त भर


दिवसभर शेतात राबत असताना दुपारच्या वेळी आजूबाजूचे शेतकरी एखाद्या झाडाखाली येऊन बसतात. त्या शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा तयार व्हावी, या अनुषंगाने दुपारच्या सत्रात साप-शिड्यांचा असलेल्या चार्टवरून खेळ खेळल्या जातो. या खेळातून फवारणी करतांना शरीर झाकून ठेवून, रसायनच्या मिश्रणाकरिता काडीचा वापर करीन, कुलूप किल्लीच्या साहाय्याने शेतातच वेगळ्या ठिकाणी रसायने साठवीन, धोका टाळण्याकरिता विजेच्या पॉइंट, वायरिंग झाकून ठेवीन आदी सकारात्मक तर शिडी चढताना नकारात्मक बाजू दिल्या आहेत. यामुळे हा खेळ खेळताना शेतकऱ्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे.

५०० शेतकऱ्यांच्या शेतात सुरक्षा पेट्या


५०० शेतकऱ्यांना सुरक्षा पेट्या वाटप करण्यात आल्या आहेत. औषधी फवारणी केल्यानंतर ते औषधी घरी न नेता वापरलेले राहिलेले औषध, डबे ते सुरक्षा पेटीमध्ये ठेवल्या जाते. यामुळे घरी काही ताण-तणाव झाल्यास अनेक शेतकरी विष प्राशन करून जीवन संपवतात. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये मानसिक ताण कमी होऊन किटकनाशके शेतातच राहत आहेत.