Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Farmers do not commit suicide; Appeal of Madhukar Pichad

बाजारभाव मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका; मधुकर पिचड यांचे आवाहन

प्रतिनिधी | Update - Sep 08, 2018, 11:26 AM IST

शेतकऱ्यांना सावकारांच्या जाचातून मुक्त करण्यासाठी भाऊसाहेब हांडे यांनी तालुक्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची

 • Farmers do not commit suicide; Appeal of Madhukar Pichad

  अकोले- शेतकऱ्यांना सावकारांच्या जाचातून मुक्त करण्यासाठी भाऊसाहेब हांडे यांनी तालुक्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची स्थापना करून सहकाराचे जाळे निर्माण केले. सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून आर्थिक हातभार लावला. ब्राह्मणवाडा परिसरात पाऊस कमी असल्याने हरितक्रांती शक्य नव्हती, पण दुग्ध व्यवसाय उभा करून परराज्यांतून संकरित गायी खरेदी करत धवलक्रांती घडवून आणली. आज शेतीमालाला बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हताश झाला आहे. असे असले तरी हांडे यांच्या कामाची प्रेरणा घेऊन त्यांनी खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभे रहावे. कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये, असे कळकळीचे आवाहन माजी मंत्री मधुकर पिचड यांनी शुक्रवारी केले.


  जिल्हा बँक सभागृहाच्या 'भाऊसाहेब महादेव हांडे सभागृह' नामकरण सोहळ्यात पिचड बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर होते. या वेळी आमदार वैभव पिचड, बँकेचे उपाध्यक्ष रामनाथ वाघ, कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे, शेतकरी नेते दशरथ सावंत, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मीनानाथ पांडे, बाजार समितीचे सभापती परबत नाईकवाडी, जे. डी. आंबरे, कारभारी उगले, अॅड. वसंत मनकर, यशवंत आभाळे, रमेश देशमुख, रमेश जगताप, स्व. हांडे यांची कन्या सुलोचना वैद्य, मुलगा पोपट हांडे, रवींद्र हांडे, अॅड. के. बी. हांडे, एल. बी. आरोटे, बाबुराव गायकर, दिनेश हुलवळे, सगाजी हुलवळे, अॅड. बी. आर. आरोटे आदी उपस्थित होते.


  पिचड म्हणाले, पूर्वी अकोले तालुक्यावर कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव होता. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी प्रेरित होऊन भाऊसाहेब हांडे यांनी तालुक्यात काँग्रेसची बांधणी करून डाव्यांशी केलेल्या संघर्षांत ठामपणे आपली भूमिका मांडली. जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष ते ४ वर्षे अध्यक्ष व अनेकदा उपाध्यक्ष होते. एकूण ३३ वर्षे संचालक म्हणून काम करताना त्यांनी सहकारी क्षेत्राला सातत्याने पाठबळ दिले, असे पिचड यांनी सांगितले.


  गायकर म्हणाले, सहकारातून शेतकऱ्यांचा विकास साधण्याचे महत्त्वपूर्ण काम भाऊसाहेब हांडे यांनी केले. ते माझे राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रातील गुरू होते. त्यांनी मला मानसपुत्र मानले होते. त्यांच्यामुळे मला सहकारी क्षेत्रात तालुक्यात व जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली.


  याप्रसंगी रामनाथ वाघ, दशरथ सावंत, मधुकर नवले आदींनी मनोगत व्यक्त केले. सुलोचना वैद्य यांनी अकोले महाविद्यालयाच्या एका शाखेला भाऊसाहेब हांडे यांचे नाव देण्याची मागणी केली. अॅड. के. बी. हांडे यांनी भाऊसाहेबांचा जीवनपट उलगडून दाखवला. कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शिवाजी नेहे यांनी केले. आभार तालुका विकास अधिकारी एस. के. कोटकर यांनी मानले.


  ब्राह्मणवाडा येथे सभागृह बांधण्यासाठी १० लाख
  भाऊसाहेब हांडे यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख पुढच्या पिढीला रहावी, म्हणून त्यांच्या मूळगावी ब्राह्मणवाडा येथे त्यांचे स्मारक उभे करून सभागृह बांधण्यासाठी १० लाख रुपये आमदार निधीतून देण्याचे आमदार वैभव पिचड यांनी या वेळी जाहीर केले.

Trending