आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना वाटले मिळेल सुग्रास पेंड, मुरघास पाहून गोण्या टाकून गाव गाठले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला असला तरी प्रत्यक्षात शासनाकडून कोणत्याही उपाययाेजना सुरू नाहीत. चारा छावण्या सुरू नसल्याने शेतकरी हैराण आहेत. अशा परिस्थितीत बीड जिल्हा दौऱ्यावर येत असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३० ट्रक पशुखाद्य घेऊन येणार असल्याने आपल्याला सरकी पेंड किंवा सुग्रास पोते मिळतील. यातून गुरांची भूक भागेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु जाहीर सभेच्या ठिकाणी हाती पडलेल्या गोण्यांत मुरघास निघाला. सभेस पशुखाद्य घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी नाराज होत मुरघासच्या गोण्या गावाकडे घेऊन जाणे परवडणारे नसल्याने त्या सभेच्या ठिकाणीच टाकून देत गावाची वाट धरली. 

 

बीड शहरातील आशीर्वाद लॉन्सच्या पाठीमागील मैदानात बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेतच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पशुखाद्याच्या गोण्या वाटप करण्यात आल्या. सभा संपल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निघून जाताच शेतकऱ्यांनी गोण्या फोडल्या तेव्हा त्यांचा भ्रमनिरास झाला. बीडला येताना पशुखाद्य म्हणून सुग्रास किंवा पेंड मिळेल अशी चर्चा होती. परंतु प्रत्यक्षात ओली मका व उसापासून तयार केलेला मुरघास शेतकऱ्यांच्या हाती पडला. फोडलेल्या गोण्यांतून मळी सारखा उग्र वास येत असल्याने हा मुरघास गुरे खातील की नाही ही चिंता शेतकऱ्यांत निर्माण होऊन आता या गोण्या गावाकडे कशा न्याव्यात. त्याचा खर्चही परवडू शकत नाही म्हणून काही शेतकऱ्यांनी त्या सभेच्या ठिकाणीच टाकून दिल्या. सभेच्या ठिकाणी आलेले शेतकरी नारायण खाटकर रा.अंबाजोगाई यांनी मिळालेले मुरघासचे पोते अंबाजोगाईला कसे न्यावे म्हणून सभेच्या मंडपात टाकून गावाची वाट धरली. आम्हाला वाटले होते सुग्रास किंवा सरकी पेंड मिळेल. परंतु हाती भुसकट आले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर वडवणी तालुक्यातील खापरवाडी येथील शेतकरी श्रीधर इतापे यांनी ओला भुसाच हाती दिला, असे सांगितले. हा मकाचा मुरघास असून त्याचा मळीसारखा उग्र वास येत असल्याने गुरे हा चारा म्हणून खातील की नाही याची शाश्वती नसल्याचे त्यांनी सांगितले. केज तालुक्यातील अखिल पठाण, गणेश इंगळे, सरकार वाघमारे, सागर दीक्षित, रोहित सावंत, महेश ढवारे, वैभव इंगळे सागर पडवळ, या शेतकऱ्यांनी मात्र मुरघासच्या बॅग एकत्रित करून गावाकडे घेऊन जाणार असल्याचे सांगितले. ताडसोन्ना येथील शेतकरी महादेव मुंडे यांनी हे ऊस व मक्याचे भुसकट असून काही का होईना दिले आहे. घरी घेऊन जाऊ असे सांगितले. सभा मंडपाच्या ठिकाणी शेतकऱ्यांना मुरघासाबरोबरच पाण्याच्या टाक्या सुद्धा वाटप करण्यात आल्या. काही शेतकरी गोण्या डोक्यावर घेऊन आपल्या वाहनात टाकत होते. 

 

मुरघासाचे भाव आठ रुपये किलो 
दुष्काळात शेतकऱ्यांना मुरघास दिला जातो. नगर व पुणे जिल्ह्यात दुभत्या जनावरांना हा पशुखाद्य म्हणून पुरवतात. मका, ऊस वाढे असे कल्चर तयार करून मुरघास तयार केला जातो. आंबटगोड असलेला हा मुरघास सात ते आठ रुपये किलो दराने नगर जिल्ह्यात विक्री हाेतो, अशी माहिती नगरचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सु.के. तुबांरे यांनी दिव्य मराठी'शी बोलताना दिली. 

 

उद्धव ठाकरेंची मराठवाड्यासाठी आणखी १०० ट्रक पशुखाद्य देण्याची घोषणा 
बीडच्या जाहीर सभेत बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यासाठी आम्ही १०० ट्रकपेक्षा जास्त पशुखाद्य देणार असल्याचे सांगितले. आम्ही नुसत्या घोषणा करून जगत नाही आज गुरांना चाराच नाही. चारा छावणीला द्यायचा की दावणीला हा घोळ कायम आहे.राज्य सरकारने गुरांना चारा द्यावा, पाणी द्यावे एवढे झाले तरी तुम्हाला खूप आशीर्वाद मिळतील, असे ठाकरे यांनी भाषणात सांगितले. 

 

हल्या भुसकट खातो 
दुष्काळात गुरे जगवण्यासाठी आम्हाला पशुखाद्य मिळणार असल्याने आम्ही सभेला आलो. हातात पशुखाद्याची गोणी पडली तेव्हा ती आम्ही फोडली असता यात तर मका आणि उसाचे भुसकटच निघाले आहे. हल्या भुसकट खातो असाच काहीसा हा प्रकार आहे. आम्हाला मुरघास मिळले असे वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. 

बातम्या आणखी आहेत...