आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारचे ‘चंबळ,’ जमिनीच्या ताब्यासाठी शेतकऱ्यांचे खून; ४५ पेक्षा जास्त भागात टोळ्यांचेच राज्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधेपुरा येथील कोसी नदीच्या परिसरात दिवसा घोड्यावर फिरणारे गुंड. - Divya Marathi
मधेपुरा येथील कोसी नदीच्या परिसरात दिवसा घोड्यावर फिरणारे गुंड.

भागलपूर / मुंगेर- बिहारमधील कास व झौवा जंगल म्हणजे गुन्हेगारींचे मोठे विश्व. येथील गंगा व कोसी नदीच्या परिसरात असलेल्या शेतकऱ्यांच्या दोन हजार एकर जमिनीवर गुंडांचा ताबा आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने येथे पीक घेण्याच्या प्रयत्न केल्यास त्याचा मृत्यू अटळ आहे. हे गुंड शेतकऱ्यांना चाबकाने फोडून काढतात. तो अर्धमेला झाल्यानंतर त्याला गोळ्या घालून ठार मारले जाते. त्यानंतर त्याचा मृतदेह नदीत फेकून दिला जातो. यामुळे खुनाचा पुरावाही नष्ट होतो. तक्रार केल्यास पोलिसही येथे जाण्यास धजावत नाहीत. कारण हिंमत असेल तर आमच्या भागात येऊन दाखवा, अशी उघड धमकी त्यांनी पोलिसांना दिली आहे. या परिसरात ६० हून अधिक गुंडाच्या टोळ्या सक्रिय आहेत. 


या टोळ्यांतील अनेक गुन्हेगार गावाचे सरपंच झालेले आहेत. त्यांच्या भागातील लोक न्यायासाठी कोर्टात अथवा पोलिस ठाण्यात न जाता, या सरपंचाच्या कोर्टात गाऱ्हाणे मांडतात. तेथे त्यांच्या तक्रारीची सुनावणी होते. काहीही काम न करता, या गुंडांना पाच ते दहा लाखांची कमाई होते. ज्या शेतकऱ्याकडे शस्त्र आणि घोडा असेल तोच घरी शेतातील पीक घेऊन जाऊ शकतो. शस्त्रे जमिनी व पिकाच्या सुरक्षेसाठी लागतात. तर घोडा त्या दहशतवादी भागात जाण्यासाठी वापरला जातो.  


गुन्हेगारांच्या तावडीतून हा भाग मोकळा होईल : एसपी निधीराणी 

 

नवगछिया येथून फरार झालेल्या गुंडांना पोलिस का पकडू शकत नाहीत?  
> पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी एसटीएफची मदत घेतली जात आहे.  


ते तर गावात नसतात.  
>नसतीलही कदाचित. पण पोलिसांनी तेथे अनेक वेळा कारवाई केलेली आहे.  


या परिसरात पोलिस का जात नाहीत?  
> पोलिस जातात. पण प्रदेश दुर्गम आहे.  या भागाच्या दुसऱ्या किनाऱ्यावरचा प्रदेश दुसऱ्याच जिल्ह्यात येतो. गुंड नावेने दुसऱ्या जिल्ह्यात पळून जातात. यावर मार्ग शाेधला जात अाहे.  


गुंड घोडे, अत्याधुनिक शस्त्रे वापरतात. आणि पोलिस..?  
> पोलिसही घोड्याचा वापर करतात.  


आणि शस्त्रे?  
> या भागात जितक्या मोहिमा आम्ही राबवल्या त्यात आमच्या पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रे सापडली नाहीत. मात्र यासंदर्भात तुमच्याकडे काही माहिती अथवा छायाचित्रे असतील तर आम्हाला सांगा.


एका टोळीची दहा लाखांची कमाई  
भागलपूर येथे नवगछिया येथे गुंडांनी बंदुकीच्या दहशतीवर शेतकऱ्यांवर अत्याचार चालवले आहेत. एका टोळीची वर्षाकाठी दहा लाख रुपये कमाई होते. म्हणजे ६० टोळ्यांची कमाई ६ कोटी रुपये. यातून ते शस्त्रे विकत घेतात व नव्या तरुणांची भरती करतात. या टोळीचा प्रमुख टोळीतील सदस्यांना दरमहा  ठरावीक रक्कम देतो. 

बातम्या आणखी आहेत...