आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली : सेनगाव तालुक्यातील बरडा गावालगत म्हसोबाचा माळ शिवारात शेतात जागलीसाठी गेलेल्या ६५ वर्षीय शेतकऱ्याचा दगडाने ठेचून खून करून मृतदेह तुरीच्या ओळीत टाकून दिल्याची घटना शुक्रवारी (ता.१०) पहाटेच्या सुमारास घडली आहे. या खुनाने म्हसोबाचा माळ हादरून गेला आहे. सेनगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
सेनगाव तालुक्यातील बरडा येेथील वामन लक्ष्मण शेंडगे (६५) यांचे गावालगत म्हसोबाचा माळ शिवारात शेत आहे. शेतात सध्या तूर व इतर पिके आहेत. या भागात रानडुकरांचे कळप असल्यामुळे पिकांच्या संरक्षणासाठी रात्री जागलीसाठी जावे लागते. रात्री शेतात फटाके फोडल्याच्या आवाजामुळे रानडुकरे शेतात येत नाहीत. नेहमी प्रमाणे वामन शेंडगे हे गुरुवारी (ता.९) रात्री शेतात जागलीसाठी गेले होते. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्यांनी फटाकेही फोडले. मात्र त्यानंतर त्यांचा शेतातून आवाजच आला नाही. तर शुक्रवारी सकाळी ते घरी आले नसल्यामुळे त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर शेंडगे हा शेतात पाहण्यासाठी गेला होता. झोपडीमध्ये कोणीच नसल्यामुळे त्याने तुरीच्या शेतात पाहणी केली. यामध्ये तुरीच्या ओळीत वामन शेंडगे यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या तोंडावर व डोक्यावर दगडाने वार केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे घाबरलेल्या ज्ञानेश्वर याने तातडीने सेनगाव पोलिसांना माहिती दिली. सेनगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक सरदारसिंह ठाकूर, उपनिरीक्षक श्री. माखणे, जमादार अनिल भारती, पद्माकर खंदारे, शेषराव राठोड यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेले दगड ताब्यात घेतले आहेत. दुपारी वामन शेंडगे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दुसऱ्या खुनाने सिरियल किलरची शक्यता बळावली
सेनगाव तालुक्यातील तळणी येथे शेतात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या महिलेचा गळा आवळून खून झाल्याची घटना रविवारी (ता.५) घडली होती. या प्रकरणी नर्सी नामदेव पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यानंतर आता शुक्रवारी (ता.१०) शेतात जागलीसाठी गेेलेल्या व्यक्तीचा खून झाला. या खुनामुळे सिरियल किलरची शक्यता आणखी बळावली आहे.
सेनगाव तालुक्यातील बरडा येथील मसोबाचा माळ िशवारात पाहणी करताना सेनगाव पोलिसांचे पथक.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.