आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'साखरपट्टा'म्हणून ओळख असलेला पापरी परिसर होतोय 'शुगरकेन फ्री', दुष्काळाला कंटाळून शेतकरी करत आहेत फळबागांची लागवड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पापरी- मोहोळ तालुक्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यात साखरपट्टा म्हणून ओळख असलेल्या पापरी पेनुर, येवती परिसरात उस उत्पादक शेतकरी उस पिक गाळपास जाण्यासाठी लागणाऱ्या व गेलेल्या उसाचे पैसे हातात येणाऱ्या वेळेची दिरंगाई, याचा विचार करत कंटाळून आता फळबागा लागवडीकडे वळला आहे. सुमारे 60 ते 70 एकर क्षेत्राच्यावर नवीन द्राक्ष बागा लागवड करण्यात आल्या आहेत. द्राक्षांसोबतच पेरू, सिताफळ इत्यांदीच्या शेतकरी फळ बागा लागवड करू लागले असल्याचे चित्र दिसत आहे.

 

नवीन फळबागा लागवड केलेले शेतकरी हे उस उत्पादक आहेत. दिवसें-दिवस वाढत चाललेला निसर्गाचा लहरीपणा, त्यातून येणारा दुष्काळ आणि दुष्काळामुळे शेतातील बोअर, विहिरी आदि पाणी स्त्रोताची घटलेली पाणी पातळी, त्यातून जोपासन्यात येणारे उस पिक गाळपास जाण्यापर्यंत 15 ते 17 महिने कालावधी लागतो. तसेच गाळपास गेलेल्या उसाचे पैसे हातात येण्यासाठी लागणारा अनेक महिन्यांचा अवधी, याचा सारासार विचार करत पापरी परिसरातील उस उत्पादक शेतकरी आता उस पिक घेण्याबाबत उत्सुक नसून ते आता फळ बागांकडे वळू लागले आहेत.

 

गेल्या दोन-चार महिन्यांपासून पापरी परिसरात 60 एकरच्यावर क्षेत्रात माणिक चमन व सुपर सोनाका जातीच्या द्राक्ष बागांची लागवड झाली आहे, तर अजूनही काही शेतकरी द्राक्ष पेरू, सिताफळ बागा लागवड करत असताना दिसून येत आहेत.  दुष्काळामुळे विहिरी बोअरची घटलेली पाणी पातळी, वाढती मजुरी व मजूर टंचाई यामुळे शेतकरी कमी पाण्यात, कमी मजुरात निघणारी पिके घेवू लागले आहेत. फळबागांना पाणी कमी लागत असल्याने तसेच द्राक्ष बागेच्या यशस्वी बहारासाठी आता शेतकऱ्यांना कृषी पदवी घेतलेले "मास्तर" उपलब्ध होवू लागल्याने त्यांनी ठरवून दिलेल्या शेड्यूल प्रमाणे फवारणी खत मात्रा देणे सोपे झाले आहे. तसेच बागेच्या वेलीच्या कामठ्या बांधन्या पासून त्याची रिकट, लोखंडी फाउंडेशन, आलेला माल उतरनी साठीही समुहाने मजूर उक्त्या स्वरुपात प्राप्त होत असल्याने शेतकऱ्यांना मजुरासाठी हांजीहांजी करण्याची गरज नाहीये. त्यामुळेच शेतकरी या बागेकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. 

 

एक एकर उस पिक 15 ते 17 महीने सांभाळून त्यातून मिळणारे आर्थिक उत्पादन व द्राक्ष बागेतुन एकरी मिळणारे आर्थिक उत्पादन यांत तफावत असल्याने शेतकरी द्राक्ष बागांना पसंती देत आहे. मागील दोन वर्षापुर्वी पापरी परिसरातील समाधान भोसले, बाबुराव भोसले, नाना भोसले या ठराविक शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा लावल्या होत्या त्यांचे चांगल्या प्रमाणात अर्थार्जन झाले. त्यांचा अनुभव पाहुन त्यांच्या मार्गदर्शनानेच नवीन लागवडी करण्याचे धाडस शेतकरी करू लागले आहेत. काही नवीन युवा शेतकरी खरबूज, कलिंगड, काकडी आदि कमी अवधितील कमी वेळेतील व कमी पाण्यातील वेलवर्गीय पिके घेत असताना दिसत आहेत.

 

आधीच गेल्या हंगामात उसावर हुमनी अळीने उपद्रव केल्याने उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले होते, नंतर दुष्काळामुळे पाणी कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला उस चारा म्हणून विक्री केली. आता उस उत्पादक शेतकरी फळ बागाकडे वळू लागल्याने मोहोळ तालुक्यातील पापरी, पेनुर, खंडाळी, येवती आदि साखरपट्टा म्हणून ओळख असलेला परिसर फळबागांचा होवू लागला आहे. पापरी गावची बोरबांगामुळे जिल्ह्यात जुनी ओळख. बोरांचे गाव म्हणून ओळख आहे तसे आता जून्या व नवीन द्राक्ष बागांची लागवड 125 एकराच्या वर झाल्याने भविष्यात आणखी लागवडी वाढणार असल्याने गावाची ओळख द्राक्षांचे गाव म्हणून होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.


गावातील नवीन द्राक्ष लागवड केलेले शेतकरी राजेंद्र शेळके यांनी सांगितले- "मला 10 एकरच्यावर शेत जमीन आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी फक्त उस हेच पिक घेत आहे, मात्र या वर्षी गेल्या दोन महिन्यापूर्वी साडे चार एकर क्षेत्रावर द्राक्षबाग़ लागवड केली. उस पिकास जाण्यास 16 ते 17 महीने लागतात. उस पिकाचे पैसे अडीच तीन वर्षातून एकदाच मिळतात मात्र द्राक्ष फळ बागेचा बहार दर 12 महिन्यांनी धरता येतो. उसापेक्षा द्राक्षाचे आर्थिक उत्पन्न जास्त होते. उस गाळपास गेल्यावरही 4 ते 5 महीने त्याचे पैसे हाती येत नाहीत, म्हणून मी उस पिकास कंटाळून द्राक्ष बागेकडे वळलो."