आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरभणी - पीक विमा न मिळाल्याने एका शेतकऱ्याने सोमवारी(दि.१८) सकाळी ११ च्या सुमारास येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात असलेल्या एका झाडावर चढून जाहीररीत्या गळफास घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शेतकऱ्याचा हा प्रकार सुरू असताना पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्याला आत्महत्येपासून परावृत्त करीत झाडावरून खाली उतरवले.
बोरवंड(ता.परभणी) येथील नरहरी तुकाराम यादव यांना बोरवंड शिवारात अडीच एकर स्वतःच्या मालकीची जमिन आहे. याशिवाय इतरांची शेती बटईने करून ते कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत असतात. २०१७ मध्ये त्यांनी पीक विमा उतरवला होता. मात्र त्या पीक विम्याची रक्कम त्यांना मिळाली नाही. त्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा चालविला होता. यंदाही अतिवृष्टीने पीक गेल्याने गेल्या काही दिवसांपासून ते आर्थिक विपन्नावस्थेत होते. त्यांना दोन मुले असून एक मुलगा आळंदी येथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेतो. मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासाठीही ओढाताण होत असल्याने श्री यादव यांची मानसिकता खालावली होती. त्यातूनच त्यांनी सोमवारी नवा मोंढा भागातील कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होऊन परिसरात असलेल्या एका झाडावर दोर घेवून चढले. ही बाब बाजार समितीच्या कर्मचा-यांसह व्यापाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी आरडाओरड करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी समजावून सांगितल्याने खाली उतरले
या प्रकाराची माहिती मिळताच कोतवाली पोलिस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले. सर्वांनीच श्री यादव यांना समजावून सांगत आत्महत्येपासून परावृत्त केले. झाडावरून खाली उतरवून श्री यादव यांची समजूत घालण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.