आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज कार्यालयामध्ये विष घेत शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई - शेतातील पंपाला दुसऱ्या फीडरवरून वीज जोडणी बदलून मिळत नसल्याने तालुक्यातील अकोला  येथील शेतकऱ्याने वीज कंपनीच्या कार्यालयातच कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सकाळी अंबाजोगाईत घडली. या प्रकरणी बुधवारी दुपारी अंबाजोगाई शहर पोलिसांत शेतकऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या तालुक्यातील अकोला येथील शेतकरी अरुण रंगनाथ बरकते (५०) यांच्या शेतात बोअरवेल असून वीज कंपनीकडून कमी दाबाने वीज येत असल्याने शेतातील  कृषिपंप  चालत नव्हता. विजेच्या पंपाला दुसऱ्या  फीडरवरून जोडणी  मिळावी अशी मागणी वीज वितरण कंपनीकडे वारंवार करत होते. मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, मंगळवारी सकाळी शेतकरी अरुण बरकते हे  शहरातील रमाबाई चौकातील  वीज कंपनीच्या  कार्यालयात आले. त्यांनी मला दुसऱ्या फीडरवरून वीज जोडणी मिळते की नाही असे विचारले असता त्यांना अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे  बरकते यांनी सोबत आणलेले कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 



तेव्हा एकच गोंधळ उडाला. अंबाजोगाई  शहर पोलिसांनी कार्यालयात भेट देऊन त्यांना स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या  शेतकऱ्याची  प्रकृती स्थिर आहे. वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सदरील शेतकऱ्याच्याच  विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.  तपास जमादार बाबासाहेब नागरगोजे करीत आहेत. 



शेतकऱ्याच्या शेतात वीजपुरवठा सुरू आहे 

अकाेला येथील शेतकऱ्याने त्याच्या पंपाला कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने दुसऱ्या
फीडरवरून वीज बदलून मागितली होती. मात्र आम्ही प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली असता व्यवस्थित वीजपुरवठा सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्याच्या आरोपात काहीच तथ्य नाही. -सुनील मस्के, प्रभारी उपकार्यकारी अभियंता, महावितरण

बातम्या आणखी आहेत...