Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Farmers will be completely devastated by proposed ground water law; MP Raju Shetty

प्रस्तावित भूजल कायद्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार; खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली भीती

प्रतिनिधी | Update - Sep 12, 2018, 11:42 AM IST

केंद्र व राज्यातील सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेतल्यानेच शेतकरी अडचणीत आला आहे.

 • Farmers will be completely devastated by proposed ground water law; MP Raju Shetty

  सोलापूर- केंद्र व राज्यातील सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेतल्यानेच शेतकरी अडचणीत आला आहे. आता पाण्याचा शेतीसाठी होत असलेला अतिवापर टाळण्यासाठी नवीन भूजल कायदा आणू पाहत आहे. हा कायदा लागू झाल्यास शेतकरी पूर्णपणे अडचणीत सापडणार आहे. विहीर, बोअरसाठी शासनाचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत, कारण त्याचे पूर्ण नियंत्रण त्यांच्या हातात असणार आहे. या कायद्यामुळे शेतकरीच उद््ध्वस्त होणार असल्याची भीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांकडील पाणी वापर कमी करायचा असल्यास कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना चांगला भाव द्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.


  डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते स्व. वसंतराव आपटे यांच्या प्रथम स्मरणार्थ आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हाध्यक्ष महामूद पटेल, सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक सिद्रामप्पा अब्दुलपूरकर, अमोल हिपरगे, बाजार समिती संचालक बाळासाहेब शेळके, 'दिव्य मराठी'चे वृत्तसंपादक श्रीकांत कांबळे, विनय आपटे, महेश आपटे, विष्णू बागल, समाधान पाटील, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष महामूद पटेल यांनी प्रास्ताविक केले. यावेळी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वसंत गायकवाड यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.


  कोणत्याही चळवळीत काम करणेे आता सोपे राहिले नसल्याचे सांगून खासदार शेट्टी म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील संघटनेचे कणखर नेतृत्व म्हणून आम्ही वसंतराव आपटे यांच्याकडे पाहायचो. ते संघटनेतील कार्यकर्त्यांसाठी आधारवड होते, सावली होती. त्यांच्यामुळेच जिल्ह्यात संघटना टिकली, वाढली. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे, त्यांना न्याय देणे हेच त्यांच्यासाठी समाधानाची गोष्ट ठरणार आहे. देशातील शेतीची स्थिती विचित्र अवस्थेत आहे. इकडे पाऊस नाही तर आमच्याकडे ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करावी लागत आहे. मागील वर्षाचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे सहकारमंत्रीच देत नसतील तर दाद कोणाकडे मागायची ? असा सवाल शेट्टी यांनी केला. जी काही एफआरपीपोटी रक्कम दिली आहे, ती शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे दिली आहे. आता १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. मुदतीत पैसे न दिल्यास २० सप्टेंबरपासून शेतकरी संघटना सहकारमंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.


  निर्मलकुमार फडकुले सभागृहात शेतकरी संघटनेच्या वतीने वसंतराव आपटे यांच्या प्रथम स्मरणार्थ आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना खासदार राजू शेट्टी. यावेळी रविकांत तुपकर, बाळासाहेब शेळके, अमोल हिप्परगे, जिल्हाध्यक्ष महामूद पटेल, सिद्रामप्पा अब्दुलपूरकर, विनय आपटे, महेश आपटे आदी.

  नरसिंग मिलच्या २७ एकर जागेच्या विक्रीचा घाट...
  प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर म्हणाले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत दोन्ही देशमुखांना काहीच देणे-घेणे नाही. नरसिंग गिरजी मिलच्या २७ एकर जागेची विक्री करण्याचा घाट घातला जात आहे, याबाबत सोलापूरकरांनी वेळीच जागे होण्याची गरज आहे. शिवाय केंद्र व राज्य सरकारच्या कृषी धोरणावर सडकून टीका केली. काँग्रेसच्या काळात शेतकरी फक्त आत्महत्या करीत होते, आता मात्र मुख्यमंत्री यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या करीत आहेत. मी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, कारण चळवळीतील तरुणांचा, युवा पिढीचा विश्वास आम्हाला कायम ठेवायचा आहे. तुमचे प्रश्न आहेत, यासाठी तुम्ही आम्हाला ताकद द्या, आम्ही तुमचे प्रश्न सोडवू, असे आश्वासन श्री. तुपकर यांनी दिले.

Trending