आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भावनिक वातावरण   

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

फारूक काझी

भावनिक वातावरण ही मुलांची मूलभूत गरज आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजांइतकीच महत्त्वाची. मुलांना भावनिक आधार देणं, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर करणं, त्यांना समजून घेणं, त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करणं, प्रेम आणि विश्वासाचं नातं निर्माण करणं अशा काही बाबींचा या भावनिक वातावरणात समावेश होतो. भावनिक स्थैर्य ही काळाची गरज आहे आणि पालक म्हणून आपली जबाबदारीही.
मुलांच्या शारीरिक वाढीसाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले जातात. जाहिरातीही त्यावर अधिकाधिक भर देत असतात. कपडे, पूरक आहार, औषधं इत्यादीविषयी सतत काही ना काही सांगितलं, बोललं जातं. मात्र, त्यात मुलांच्या भावनिक बाजूचा कितपत विचार केला जातो? त्यांना भावनिक वातावरण पुरवण्यात यशस्वी झालेले असतो का? भावनिक वातावरण ही बदलत्या काळातली महत्त्वाची गोष्ट आहे. भौतिक सुविधांच्या कोलाहलात भावनांचा कोंडमारा होतोय. 

मुलांचा आदर

प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते. मोठ्या व्यक्तींचा जसा आदर झाला पाहिजे तसाच तो लहान मुलांचाही झाला पाहिजे. कारण मिळालेला आदर तुमची स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्यात कामी येते. सतत नकारात्मक बोलणी, दोष दिला जाणं, नावं ठेवणं यामुळे मुलांची व्यक्तिमत्त्वं करपून जातात. अशी मुलं जीवनात उभारी घेण्याचं धाडस करत नाहीत. मुलांचा आदर हे बदलत्या पालकत्वाचं महत्त्वाचं लक्षण आहे.

गृहकलहांपासून दूरच ठेवा मुलांना

आई-बाबा, कुटुंबातील इतर व्यक्ती यांच्यातील बेबनाव, भांडणं, मनमुटाव यांचा मुलांच्या भावनिक आयुष्यावर परिणाम होतो. भावनिक विश्व उद्ध्वस्त होऊन जातं. म्हणून मोठ्यांनी मुलांना कलहापासून दूर ठेवले पाहिजे. मोठे होतानाची आपली समज अशा ठिकाणी वापरली पाहिजे. मुलांवर वाईट परिणाम होणार नाही ना, याची काळजी आधी घ्यायला हवी.

प्रेम आणि नात्यांची घट्ट वीण

प्रेमाने नाती घट्ट होतात. डोक्यावरून मायेनं हात फिरवला, नवीन काही करून पाहिलं तर पाठीवर शाबासकी देणं, घट्ट मिठी, पापी या साध्या सोप्या गोष्टी तुम्हाला मुलांच्या खूप जवळ नेतात. नात्यांची वीण घट्ट होते. ही भावनिक कोवळीक जपायला हवी. पालक म्हणून ती आपली मोठी जबाबदारी आहे. अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आणि संधी

भारतीय कुटुंबात मुलांना फारसं विचारात घेतलं जात नाही. ते लहान आणि अनुत्पादक घटक समजले जातात.मुलं असुरक्षित, परावलंबी असल्यानं त्यांच्या मतांना किंमत नसते. वास्तविक असं स्वातंत्र्य, संधी  देण्यामुळे मुलं अधिक सक्षम आणि अधिक जबाबदार बनतात. पालकांनी त्यासाठी पाल्यांना स्वत:चं मत मांडण्याची संधी द्यावी. 

तुलनेनं काही साधत नाही

“अल्फाजपेक्षा गझल छान दिसते” एकदा मला असं एक जण म्हणाले. खरं तर ही तुलनाच निरर्थक होती. अशा तुलना करून आपण नेमकं काय साधतो, याचं उत्तर आपण कधीच शोधत नाही. उलट प्रत्येक मूल वेगळं, वैशिष्ट्यपूर्ण आहे याची आपल्याला जाणीव असायला हवी. गुण, रूप, कला इत्यादींवरून मुलांच्यात तुलना करणं टाळायला हवं. आपणच मुलांच्या मनात न्यूनगंड निर्माण करतो. उलट त्याचा स्वीकार त्याला आयुष्यात भरारी घेण्यास मदतच करतो.

बाजू घेणं टाळायला हवं 

दोन भावंडे जेव्हा भांडण करतात तेव्हा दोन्हींची बाजू ऐकून घ्यायला हवी. चूक कोणाची हे समोर ठरवलं जायला हवं. अन्यथा दोघांची बाजू ऐकून न घेता आपण एकाच मुलाची बाजू घेतली तर हा दुसऱ्या मुलावर एक प्रकारे अन्याय असतो. अशाने आपल्या मुलांच्या मनात आपली वाईट प्रतिमा तयार होऊ शकते. त्या पुढे जाऊन घातक ठरू शकतात. तेव्हा दोन्ही मुलांना ऐकून मगच निर्णय द्या. आपल्या मुलांवर विश्वास असू द्या. मात्र तो फाजील किंवा आंधळा असू नये.

भावनांचं समायोजन शिकवा :

मुलं भावनेच्या भरात काही गोष्टी करतात. खरं तर वय वाढत जाईल तशी समज वाढते. ही समज वाढायला आपणच मदत केली पाहिजे. भावनांना आवर कसा घालावा, विचार करून कृती कशी करावी हे मुलांना सांगायला हवं. मात्र तेही सकारात्मक. अन्यथा आपली चुकीची शिकवण मुलांची सवय होऊन जाईल.

लेखकाचा संपर्क : ९९२१३८०९६६