आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस सरकारकडून आकर्षक निर्णयांचा धडाका; विनाअनुदानित शाळांसह शिक्षकांना २०% अनुदान; ३०४ कोटींची तरतूद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधानसभा निवडणुकांच्या ताेंडावर मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सर्वच घटकांना लाभ देणाऱ्या निर्णयांचा धडाका लावला. विनाअनुदानित शाळा व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २० टक्के अनुदान, आधी २० टक्के अनुदान असणाऱ्या शाळांना दुसऱ्या टप्प्यांतील अनुदान मंजुरीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा ४६२३ शाळांतील ४३,११२ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. त्यासाठी ३०४ कोटी रुपये अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच सातव्या वेतन आयोगानुसार अपेक्षित रक्कम रुपये ५४६ कोटींची पुरवणी मागणी पुढील अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे.

विनाअनुदानित शाळांबाबत सुरू आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विनाअनुदानित प्राथमिक २७६ शाळा व १०३१ तुकड्यांवरील २८५१ शिक्षक व शिक्षकेतर पदांना १ एप्रिल २०१९ पासून २० % तर माध्यमिक १२८ शाळा व ७९८ तुकड्यांवरील २१६० शिक्षक, शिक्षकेतर पदांना, उच्च माध्यमिकच्या १५ तुकड्यांवरील ३४ शिक्षकांनाही २० % अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी १९ सप्टेंबर २०१६ राेजी काही शाळांना २० टक्के अनुदान मंजूर केले हाेते, अशा २४१७ शाळा व ४५६१ तुकड्यांवरील २८२१७ शिक्षक, शिक्षकेतर पदांना वाढीव २० टक्के अनुदानही मंजूर करण्यात आले. 
 

वैद्यकीय महाविद्यालयांत इंटर्नशिप करणाऱ्यांच्या विद्यावेतनात वाढ
शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद आणि शासन अनुदानित आयुर्वेद, युनानी महाविद्यालयात इंटर्नशिप करणाऱ्या उमेदवारांच्या विद्यावेतनात भरीव वाढ करण्यात आली. १ ऑगस्टपासून आता हे विद्यावेतन ६ हजार रुपयांवरून ११ हजार रुपये करण्यात आले आहे. वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर संबंधित विद्यार्थ्यांना एक वर्षाची इंटरर्नशिप करणे आवश्यक असते. या काळात विद्यार्थ्यांना रुग्णालयात सेवा देण्यासाठी मासिक विद्यावेतन देण्यात येते. 
 

साहित्यिक, कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ 
राज्यातील ज्येष्ठ (वृद्ध), साहित्यिक, कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढीचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला.  २६ हजार मान्यवरांना याचा लाभ हाेईल. सध्या अ वर्गातील कलावंतांना २१००, ब वर्गासाठी १८०० तर क वर्गातील कलावंतांना १५०० याप्रमाणे दरमहा मानधन दिले जात होते.
 

५० आश्रमशाळांचे इंग्रजी, सेमी इंग्रजीत रूपांतरण
आदिवासी विकास विभागाच्या  ५० आश्रमशाळांचे इंग्रजी-सेमी इंग्रजीमध्ये रूपांतरण करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या शाळांमध्ये पहिलीचा इंग्रजी माध्यमाचा वर्ग सुरू करण्यासह इयत्ता ६ वी पासूनच्या वर्गांचे विज्ञान व गणित हे विषय यंदापासून इंग्रजी भाषेमधून शिकवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
 
 

आदिवासी गुणवत्तेकडे लक्ष :
राज्यातील डोंगराळ व दुर्गम भागातील सामाजिक-शैक्षणिकदृष्ट्या मागास आदिवासी समूहातील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागांतर्गत ५०२ शासकीय आश्रमशाळा चालवण्यात येतात. यापैकी १२१ आश्रमशाळांमध्ये उच्च माध्यमिक शिक्षण देण्यात येते. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार मराठीमधून शिक्षण देण्यात येत असून यामध्ये सुमारे दोन लाख विद्यार्थी आहेत. पहिल्या टप्प्यात प्रतिवर्षी २ हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देण्यात येईल. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होऊन त्यांचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढण्यास मदत होईल.

बातम्या आणखी आहेत...