आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाराबंदीची फॅशन हद्दपार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या माझ्या एका मित्रांनी मला पत्र पाठवले. त्याचे पत्र आल्याने उन्हाळ्यात पावसाचा थंड शिडकावा झाल्यासारखे वाटले. आजच्या पिढीला यात फारसा रस नाही, पण मला तरुणपणाचा काळ आठवला. त्या वेळी सर्व माहिती पत्रातूनच समजत होती. म्हणून पोस्टमनची उत्सुकतेने वाट पाहिली जायची. पत्र जेव्हा माझ्या मुलांनी फोडले आणि वाचण्यासाठी माझ्या हातात दिले, तेव्हा मला समाधान वाटले. ज्याची पत्रे त्यांनीच वाचावीत हा संस्कार आजची पिढी जपते आहे, हे पाहून मनाला समाधान वाटले. पत्रात माझ्या मित्राने लिहिले होते की, ‘बाराबंदी आमच्या गावात मिळत नाही. शिवाय आता तरुणांचा काळ आहे. त्यांची आवडनिवड, फॅशन पाहून कपडे मार्केटला येत आहेत. मग आमच्या बाराबंदीला विचारतंयं कोण?’ मला वाटले आपण मोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहतो, कदाचित इथे मिळू शकेल. म्हणून दुकाने उघडल्यावर बाजारात फेरफटका मारण्यास निघालो. सगळीकडे शोध घेतला. नाहीचा पाढा ऐकण्यास मिळाला. दुपारी मोठी दुकाने शोधली. बाराबंदी आता बंद झाली असल्याची माहिती मिळाली.

आपण आपली पारंपरिक वेषभूषा विसरत चाललो आहोत, यांची खंतही वाटली. स्त्रिया आता नऊवारी साडी फॅशन म्हणून वापरतात. शिवाय साड्या फक्त विवाह समारंभाच्या वेळीच घातलेल्या दिसून येतात. तसेच बाराबंदीचा रुबाबदारपणा वेगळाच आहे, हे फक्त ज्येष्ठांना कळते. आमची बाराबंदीबाबत चर्चा चालू असताना माझ्या मुलाच्या एका मित्राने सांगितले, अहो काका, धोतरबंडीची फॅशन आता बंद झाली. नाटक कंपनीत हा ड्रेस किरायाने मिळतो. मी एका जुन्या नाटक कंपनीला कपडे पुरवणा-या दुकानात गेलो असता त्याने मळालेली बाराबंदी दाखवली. तीच बंदी मी टेलरकडे घेऊन गेलो तर त्याला शिवायला जमले नाहीच. त्या बाराबंदीची शेरवानीच झाली.