आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - राज्य शासनाच्या वतीने सुरू असलेल्या सर्व टोल प्लाझावर आता ‘फास्टॅग’ यंत्रणा कार्यान्वित होणार असून यामुळे टोल वसुलीत पारदर्शकता येईल. शिवाय या कामास गती मिळणार आहे. ‘फास्टॅग’संदर्भात राज्याच्या वतीने सामंजस्य कराराचे अनौपचारिक हस्तांतरण झाले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या वतीने देशभरात कार्यरत टोल प्लाझांवर ‘फास्टॅग यंत्रणा’ कार्यान्वित असून मंत्रालयाच्या आवाहनाला साद देत देशातील काही राज्यांनीही यंत्रणा बसवण्यासाठी पुढाकार घेतला. महाराष्ट्रानेही फास्टॅग यंत्रणा बसवण्याबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या भारतीय रस्ते वाहतूक व्यवस्थापन कंपनीसोबत (आयएचएमसीएल) दोन महिन्यांपूर्वीच सामंजस्य करार केला आहे.
फास्टॅग यंत्रणेचे हे आहेत फायदे
फास्टॅग यंत्रणेमुळे वाहतूकदार, टोल प्लाझा चालक, सरकारला फायदा होईल. फास्टॅग यंत्रणेच्या वापरकर्त्या वाहतूकदाराला प्रत्येक व्यवहारावर २.५% सूट मिळणार आहे. या प्लाझावर विनाथांबा वाहतूक असल्याने वाहतूकदारांच्या वेळेची बचत होईल. ई-पेमेंटमुळे रोख रक्कम बाळगण्याची गरज भासणार नाही. या व्यवहाराची पावती थेट मेलवरच मिळणार असल्याने तसा लेखाजोखा ठेवता येणार आहे.
सामंजस्य कराराचे हस्तांतरण :
डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे सोमवारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे आणि ‘आयएचएमसीएल’चे वरिष्ठ अधिकारी यांच्यात अनौपचारिकरीत्या सामंजस्य कराराचे हस्तांतरण झाले.
डिसेंबरअखेर तयारी होणार पूर्ण :
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने राज्याला यावर्षी डिसेंबरअखेर फास्टॅग यंत्रणेबाबतची तयारी पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून वेळेत हे काम पूर्ण करू. राज्यातील केंद्राच्या टोल प्लाझांवर फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सुरू असलेल्या राज्यातील एकूण ७३ टोल प्लाझांवरही फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.
खर्चात बचत :
फास्टॅगमुळे टोल प्लाझा चालकांना प्लाझा चालवण्यासाठी येणाऱ्या खर्चात बचत होणार आहे. स्वयंचलित एकीकृत संगणकीय व्यवस्थेमुळे प्लाझाचालकांना लेखेजोखे अद्ययावत ठेवता येणार आहत. तसेच कमीत कमी यंत्रणा राबवून प्रभावी सुविधा पुरवता येणार आहे.
तिहेरी फायदा :
केंद्र व राज्य शासनाला फास्टॅगमुळे इंधन बचत करणे, कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण घटवणे शक्य होईल. तसेच टोल प्लाझा व्यवस्थेमध्ये पारदर्शिता ठेवता येणार आहे व या यंत्रेणस गतीही देता येईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.