आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआता उसाचे गु-हाळ ही फक्त ऐकीव माहितीवर आधारित गोष्ट बनली आहे. परंतु एकेकाळी दिवाळीनंतर सुरू झालेले गु-हाळ उन्हाळ्यापर्यंत म्हणजे सहा-सहा महिने चालायचे. 70 च्या दशकात आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक शेतकरी गु-हाळ करून गुळाच्या ढेपी तयार करत. संपूर्ण घरदार या कामात गुंतले जायचे. कारण गुळाची कढई बिघडली तर मोठे नुकसान होत असे. म्हणून अत्यंत काळजी घेऊन गु-हाळ चालत असे. 80 च्या दशकात साखर कारखानदारीने जोर धरला आणि गु-हाळाची परंपरा मोडीत निघाली. मग कोठेतरी तुरळक एक -दोघे शेतकरीच अट्टहासाने गु-हाळ चालवत असत. अशा काळात माझ्या एका मित्राच्या शेतात गु-हाळ सुरू झाले. त्याने पाच-दहा मित्रांना सांगितले की, शेतात डबा पार्टी करू. आम्ही सर्वांनी डबे सोबत घेतले आणि उसाचा रस आणण्यासाठी एक स्टीलची बरणीही सोबत प्रत्येकाने आणलेली होती. दरम्यान, मला ओझे वाटू नये म्हणून एका मित्राने डबा घेतला. आम्ही स्टँडवर आलो आणि त्याचे शेत गावापासून तीन-चार किलोमीटर अंतरावर असल्याने बसमधून त्या स्टॉपवर उतरलो.
दरम्यान, बसमधील वरच्या रॅकवर डबा तसाच ठेवून माझा तो मित्र गप्पांच्या नादात तसाच खाली उतरला. माझ्यासह काही मित्र त्याच्यावर जोरात ओरडले, अरे डबा कुठंय? तसा तो बसकडे वळला, परंतु तोपर्यंत बस सुरू झाली होती. आम्ही काही मिनिटे बसमागे ओरडत धावत होतो. तोपर्यंत बसने वेग घेतला आणि धुरळ्याच्या लोटात ती दिसेनाशी झाली. इतक्यात पाठीमागून एक मोटारसायकलस्वार आला. त्याला आम्ही सर्वांनी विनंती केली. त्याच्या मोटारसायकलवर बसून बसचा पाठलाग सुरू केला. जवळपास पंचवीस-तीस किलोमीटर अंतरावर ती बस आम्हाला सापडली. मी रॅकवरचा डबा ताब्यात घेतला. परत गावाकडे येण्यास दुस-या बसने निघालो. गावात सगळे जण मला एकट्याला पाहून म्हणायचे, तू का गु-हाळात गेला नाहीस? सांगणार काय... मनस्ताप किती झाला!
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.