आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुटी नाकारल्याने हवाई सुंदरी हिरमुसली; वडिलांनी 6 विमानांची तिकिटे काढली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेतील डेल्टा एअरलाइन्समध्ये फ्लाइट अटेंडंट (हवाई सुंदरी) म्हणून काम करणाऱ्या पियर्स वॉनला ख्रिसमसची सुटी मिळाली नाही. हिरमुसलेल्या अापल्या कन्येला कामावर असताना एकटेपणा जाणवू नये म्हणून तिच्या वडिलांनी एक - दोन नव्हे, तर ६ विमानांची तिकिटे बुक केली आणि मुलीसोबत विमानांत ख्रिसमस साजरा केला.

 

ख्रिसमसमुळे प्रवाशांची संख्या वाढल्याने कंपनीने पियर्सला सुटी दिली नाही. तिचे वडील हॉल वॉन यांना हे समजल्यावर त्यांनी मुलगी ज्या विमानात असेल त्या विमानातच ख्रिसमस साजरा करण्याचा निर्णय घेतला. ख्रिसमसच्या सायंकाळी आणि दुसऱ्या दिवशी ते मुलीसोबत ६ उड्डाणांमध्ये सोबतच होते.

 

वडील आणि मुलीच्या अतूट नात्यातील ही हृदयस्पर्शी कथा डेल्टा एअरलाइन्सचे प्रवासी माइक लेवी यांनी सोशल मीडियावर शेअर केली. लेवी पोस्टमध्ये लिहितात की, ही माहिती शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. माझ्या शेजारील सीटवर बसलेले हाॅल वॉन यांची कन्या पियर्स आमच्याच विमानात फ्लाइट अटेंडंट आहे. तिला ख्रिसमसची सुटी मिळू शकली नाही. तिच्या चेहऱ्यावरील नाराजी वडिलांना पाहवली नाही. हाॅल वॉन दोन दिवस प्रत्येक उड्डाणात मुलीसोबत होते. ती ज्या ज्या देशात गेली तेथे विमानात वडीलही सोबत गेले. हाॅल यांनी न्यू ऑर्लियन्सपासून डेट्रॉइट आणि फोर्ट मायर्सदरम्यान सहा विमाने बदलली. पियर्सने तिचा अनुभव लिहिताना म्हटले की, यंदाचा ख्रिसमस म्हणजे माझ्यासाठी एक चमत्कारच आहे.


आजारातून उठल्यावर हॉल यांचा हा पहिलाच प्रवास
काही दिवसांपूर्वी हाॅल यांच्या पाठीला व मानेला मार लागला. त्यामुळे शरीराचा काही भाग पंगू झाला होता. वडिलांचा प्रवास सुखद आणि सोयीस्कर व्हावा म्हणून वैमानिक आणि इतर सहकाऱ्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे मी त्यांचे आभार मानू इच्छिते, असे पियर्सने म्हटले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...