आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई नसलेल्या १३ वर्षीय मुलीचे बापाने लावून दिले ४० वर्षीय माणसाशी लग्न...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- इयत्ता तिसरीमध्ये शिकत असताना आईचे दुर्धर आजाराने निधन झाले. त्यानंतर आहे त्या हलाखीच्या परिस्थितीत आयुष्य काढत असताना दारुड्या बापाने तेराव्या वर्षी थेट ४० वर्षांच्या पुरुषासोबत लग्न लावून दिले. परंतु तिकडेदेखील सुरू झालेला छळ आणि वयाने तिप्पट मोठ्या असलेल्या नवऱ्यापासून सुटका करून मुलगी वडिलांकडे परत आली. पण सासरी जाण्यासाठी दारुडा बाप मारहाण करत असल्याने तिने घर सोडून थेट घाटी पोलिस चौकी गाठत मदतीचा हात मागितला. त्यानंतर पोलिसांनी तिला दामिनी पथकाकडे सुपूर्द केले. शनिवारी दुपारी हा प्रकार समोर आला. 


शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घाटी पोलिस चौकीत सोळा वर्षांची मुलगी घाबरलेल्या अवस्थेत दाखल झाली. बसस्थानक, रेल्वेस्थानक कुठे आहे, कसे जातात असे तिने पोलिसांना विचारले. रात्रीच्या वेळी घाबरलेल्या अवस्थेत पोलिस चौकीत आलेल्या मुलीला काही तरी त्रास असल्याने पोलिसांनी तिला खाली बसवत धीर दिला. त्यानंतर तिची आस्थेवाईकपणे चौकशी केली व तिचा विश्वास संपादन केला तेव्हा मुलीने दारुड्या वडिलांच्या त्रासाला कंटाळून गाव सोडून पळून आल्याचे सांगितले. घाटी चौकीतील पोलिसांनी तिची परिस्थिती समजून घेत घाटीतील महिला कक्षात सकाळपर्यंत थांबवले. सकाळी पोलिसांनी तिला पुन्हा चौकीत आणले व दामिनी पथकाला याबद्दल माहिती दिली. दामिनी पथकाने तिची चौकशी करत तिला घरी जाण्यास सांगितले. परंतु तिने वडिलांकडे जाण्यास नकार दिल्याने सेजल आधार निकेतनमध्ये दाखल करण्यात आले. 


मुलीने घर सोडून गाठली पोलिस चौकी, घरी जाण्यास नकार, दामिनी पथकाने दिला आधार 
दुर्धर आजाराने आईचे निधन; वडील मद्यपी

 

 दामिनी पथकाला मुलीने दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत असताना दुर्धर आजाराने आईचे निधन झाले. त्यानंतर वडिलांना दारूचे व्यसन होते. माझ्या संगोपनापासून सुटका करण्यासाठी त्यांनी दोन वर्षांपूर्वी माझ्या वयाच्या मुलांच्या वडिलांशी माझे लग्न लावून दिले असल्याचे सांगताचा पोलिसांनाही धक्का बसला. आठवीत शिकत असतानाच ४० वर्षांपेक्षा अधिक मोठ्या पुरुषाशी तिचे बळजबरी लग्न लावून दिले. 


पतीच्या छळास कंटाळून माहेर गाठले, व्यसनी बापानेही अत्याचाराची सीमा गाठली 
स्वतःची त्या कुटुंबातून सुटका करत तिने पुन्हा माहेर गाठले. दोन वर्षांपासून ती माहेरीच राहत होती, परंतु दारू पिऊन बाप रोज सासरी जाण्यासाठी मारहाण करत होता. शेवटी त्याच्या त्रासाला कंटाळून शुक्रवारी रात्री तिने गाव सोडले आणि औरंगाबाद गाठले. पुन्हा वडील आणि सासरी न जाण्याचा निर्णय तिने बोलून दाखवला. वरिष्ठांशी चर्चा करून दामिनी पथकाने तिला सेजल आधार निकेतनमध्ये दाखल केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...