साहित्य संमेलन / 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो

... ...

10, 11, 12 जानेवारीला उस्मानाबादेत भरणार साहित्यिकांचा मेळा

Sep 23,2019 09:49:09 AM IST

उस्मानाबाद - जानेवारी २०२० मध्ये उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. उस्मानाबादेत संमेलनाचे अध्यक्ष निवडण्यासाठी तसेच तारखा निश्चित करण्याबराेबरच तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित महामंडळाच्या बैठकीत रविवारी हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.


अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या उस्मानाबाद येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ठाले-पाटील म्हणाले की, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली. या बैठकीला ९२ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा ढेरे, महामंडळाच्या उपाध्यक्ष विद्या देवधर, कार्यवाह दादा गोरे, कोषाध्यक्ष रामचंद्र काळुंखे, मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, सुनीता राजेपवार, विलास मानेकर, प्रदीप दाते, गजानन नारे, उषा तांबे, उज्ज्वला मेहेंदळे, प्रतिभा सराफ, भालचंद्र शिंदे, सुहास बेलेकर आणि प्रसाद देशपांडे आदी १९ पैकी १७ सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.


या वेळी चर्चेदरम्यान साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यासह महामंडळाच्या विविध घटक व संलग्न संस्थांकडून प्रवीण दवणे, प्रतिभा रानडे, भारत सासणे या नावांची शिफारस करण्यात आली होती. यावेळी दिब्रिटो यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केल्याने कोणत्याही चर्चेविना दिब्रिटो यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे दिब्रिटो यांच्या नावाची शिफारस करणारे अनेक प्रस्ताव दाखल झाले होते.

अल्प परिचय
कॅथॉलिकपंथीय ख्रिस्ती धर्मगुरू असलेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा वसई येथील मराठी ख्रिस्ती कुटुंबात झाला. लेखक म्हणून त्यांनी मराठीत विविध विषयांवर लेखन केले असले तरी त्यांची खरी ओळख ही पर्यावणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरोधात आवाज उठविणारे कार्यकर्ते, सुजाण, सजग , सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व म्हणूनही आहे. मराठी भाषिक ख्रिस्ती समाजाचे मुखपत्र असलेल्या 'सुवार्ता' या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले.

पुणे येथे १९९२ मध्ये झालेल्या पंधराव्या मराठी - ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले. 'तेजाची पाऊले', 'संघर्ष यात्रा ख्रिस्तभूमीची- इस्रायल आणि परिसराचा संघर्षमय इतिहास', 'आनंदाचे अंतरंग- मदर तेरेसा', 'सृजनाचा मोहोर', 'ओअ‍ॅसिसच्या शोधात' आदी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. 'बायबल- दी न्यू टेस्टामेंट' या पुस्तकाच्या त्यांनी मराठीत केलेल्या 'सुबोध बायबल- नवा करार' या अनुवादीत पुस्तकाला साहित्य अकादमीचा २०१३ या वर्षीचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार जाहीर झाला आहे.

X
......