आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वैजापूर- तालुक्यातील सावखेडगंगा शिवारातील विहिरीत सापडलेल्या दोन मुलांच्या खुनाचा छडा लावण्यात वीरगाव पोलिसांना यश आले आहे. त्या दोन मुलांना निष्ठूर बापानेच रागाच्या भरात विहिरीत ढकलून ठार मारल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून पोलिस त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरवत असल्याची माहिती मिळाली आहे. ही दोन्ही भावंडे कन्नड तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील रहिवासी असून त्यांची नावे कृष्णा संतोष वाळुंजे (३) व गणेश संतोष वाळुंजे (५) असल्याचे कळते.
पोलिसांनी संशयित बापास ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे लवकरच आरोपीला गजाआड केले जाण्याची शक्यता आहे. आरोपी हा दोन्ही मुलांना घेऊन दोन दिवसांपासून सराला बेट येथे काही ग्रामस्थांनी पाहिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणाला वीरगाव पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने उघड झाला.
वैजापूर तालुक्यातील बापूसाहेब कल्याण पवार यांच्या सावखेडगंगा येथील शेत गट नंबर दोन मधील विहिरीत शनिवारी दुपारी दोन मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. ही दोन्ही मुले वैजापूर तालुक्यातील नसल्याचे पोलिसांच्या तपासात लक्षात आल्यानंतर पोलिसांनी नगर येथील तोफखाना पोलिसांच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवली. मुलांच्या शर्टावरील प्लेग्रुप जेऊर या नावावरुन ही मुले त्या शाळेतील आहेत का याचा तपास घेण्यात आला. मात्र या शाळेत मुलांची आई कामास असल्याने मुलांनी तेथील शर्ट घातल्याचे उघड झाले. वाळुंजे कुटुंब संभाजीनगर रस्त्यावरील गल्लेबोरगाव येथे राहत होते व संतोष वाळुंजे हा संभाजीनगर येथे काम करत होता. पत्नीशी कडाक्याचे भांडण झाल्याने दोन्ही मुलांना घेऊन तो सावखेडगंगा परिसरात आला व त्याने दोन्ही मुलांना निर्दयीपणे विहिरीत ढकलून संपवले. याबाबत माहिती मिळताच वीरगाव पोलिसांच्या पथकाने संतोष वाळुंजे याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
असा झाला उलगडा..
सावखेडगंगा परिसरात आल्यानंतर संतोष वाळुंजे याने एका व्यक्तीच्या मोबाइलवरुन पत्नीला फोन करुन तुझ्या दोन्ही मुलांना मारुन टाकेन, असे धमकावले होते. या व्यक्तीला दोन्ही मुले विहिरीत सापडल्याचे कळताच त्याने त्वरित पोलिसांशी संपर्क साधल्याने तपासाला गती मिळाली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.