Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Father Poisoned with 2 kids  in depression; Triple death

नैराश्यातून बापाने 2 मुलांसह घेतले विष; तिघांचा मृत्यू; किनवटच्या वडोली जंगलात दुर्गंधी सुटल्याने घटना उघड 

प्रतिनिधी | Update - Feb 10, 2019, 11:08 AM IST

एक महिन्यापूर्वी मृताची पत्नी प्रियकरासोबत पळून गेली होती.

 • Father Poisoned with 2 kids  in depression; Triple death

  नांदेड- किनवट वन परिक्षेत्रातील वडोलीच्या जंगलात शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमाराला तीन जणांचे मृतदेह आढळून आले. वडील, मुलगा आणि मुलगी यांचे हे मृतदेह असून प्राथमिक अंदाजानुसार त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याचा अंदाज आहे. संतोष चव्हाण वडील (३५), रूपेश संतोष चव्हाण (१०),वेदिका संतोष चव्हाण (१२) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व जण सिंदखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राम नाईक तांडा येथील रहिवासी आहेत.

  किनवटचे पोलिस निरीक्षक दिलीप तिडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेनऊच्या सुमाराला वडोली येथे जंगलात तीनही मृतदेह आढळून आले. मृतदेहाशेजारी अन्न, उंदीर मारण्याचे औषध आढळून आले. त्यावरून त्यांनी विष खाऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे. संतोष चव्हाण हा मृत झालेल्या दोन मुलांचा बाप आहे. राम नाईक तांडा येथे ते राहत होते. एक महिन्यापूर्वी त्याची पत्नी प्रियकरासोबत पळून गेली. तेव्हापासून तो अत्यंत मानसिक तणावात होता. पत्नी पळून गेल्याने त्याला अपमानास्पद वाटत होते. त्या निराशेतच त्याने व त्याच्या मुलांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज असल्याचेही पोलिस निरीक्षक दिलीप तिडके यांनी सांगितले.

  सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष चव्हाण याने जंगलात जाताना अन्नाची पाकिटे आणि उंदीर मारण्याचे औषध सोबत घेतले. त्याने मुलांना उंदीर मारण्याचे औषध अन्नात मिसळून ते खायला दिले. त्यानंतर त्याने स्वत:ही तेच अन्न खाल्ले त्यामुळे तिघांचाही एकाच ठिकाणी मृत्यू झाला.

  आधार कार्डने पटली ओळख
  वडोलीच्या जंगलात सापडलेल्या मृतदेहाजवळ तिघांचेही आधार कार्ड सापडले. त्यामुळेच या तीनही मृतदेहाची ओळख पटू शकली. तिघेही माहूर तालुक्यातील रामनाईक तांड्याचे रहिवासी असून त्यांनी किनवट तालुक्यातील वडोली येथे येऊन आत्महत्या केली. मृतदेहाची अवस्था पाहता या तिघांनीही तीन दिवसापूर्वी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Trending