Khabre jara hatke / मुलाची प्रोफेशनल व्हिडिओ गेम प्लेअर होण्याची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून पित्याने स्वप्नपूर्तीसाठी शाळा सोडण्याचा दिला सल्ला

१६ वर्षीय जॉर्डन गेमसोबत अभ्यासासाठी लावतो ऑनलाइन क्लासेस

दिव्य मराठी

Jul 25,2019 10:07:00 AM IST

टोरँटो - मुलांचे व्हिडिओ गेम्स खेळणे सुटावे म्हणून पालक चिंता करतात. परंतु कॅनडातील एका पित्याने मुलाने व्हिडिओ गेमवर पूर्णत: लक्ष द्यावे म्हणून त्याला शाळा सोडण्यास सांगितले आहे. ई-स्पोर्ट््सच्या करिअरसाठी त्यांनी हा निर्णय घेतला. ई-स्पोर्ट््स व्हिडिओ गेम्स प्लेअर्सदरम्यान अनेक प्रकारच्या स्पर्धा असतात. या स्पर्धा संघीयसुद्धा असतात व दोन खेळाडूंमध्येही असतात. सडबरी शहरातील डेव्हिड हेरजोग यांनी त्यांच्या जॉर्डन या १६ वर्षांच्या मुलाचे ई-स्पोर्ट््स उद्योगात करिअर घडावे म्हणून त्याला सर्व मदत करत आहेत. डेव्हिड यांनी गेल्या दहा वर्षांपासून मुलाकडून या व्हिडिओ गेम्ससाठी सर्व तयारी पूर्ण करवून घेत आहेत. जॉर्डन ३ वर्षांचा असताना त्यांनी त्याला व्हिडिओ गेम्स आणून दिले. व्हिडिओ गेममधील त्याचे कौशल्य त्यांनी तेव्हाच ओळखले होते.

मित्र तर येतील-जातील, परंतु गेममुळे माझे प्रोफेशनल करिअर घडेल : जॉर्डन हेरजोग

जॉर्डन याने वयाच्या सातव्या वर्षी प्रोफेशन हॅलो प्लेअर म्हणून आपल्या पहिल्या सामन्यात दोन हजार डॉलर इतकी रक्कम जिंकली होती. जॉर्डन ऑनलाइन व्हिडिओ गेम जगातील सर्वात यशस्वी असा फोर्टनाइट प्लेअर आहे. यावर्षी होणाऱ्या जागतिक फोर्टनाइट अजिंक्यपद स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे. त्याच्यासोबत जगातील २०० खेळाडू असतील. आपली जीवनशैली पाहता जॉर्डनच्या वाट्याला इतर मुलांसारखे जगणे येऊ नये, असे त्याचे पिता डेव्हिड यांना वाटते. या वयात त्याने त्याच्या करिअरचा विचार करावा, कारण तेच त्याच्या पुढील आयुष्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. जॉर्डन म्हणाला, मला डेव्हिड यांच्यासारखे वडील मिळाले हे माझे भाग्यच आहे. माझ्या आयुष्यातील काही संधी सोडूनही दिल्या आहेत. तो म्हणतो, मित्र तर येतील आणि जातील. पण या गेम्समुळे माझे करिअर घडू शकते. या करिअरचा भविष्यात नक्कीच फायदा होईल. मला शिक्षण घेणे कायद्याने बंधनकारक आहे, याचीही कल्पना आहे. डेव्हिड म्हणाले, जॉर्डनला प्रोफेशनल व्हिडिओ गेम प्लेअर होण्यासाठी मी घेतलेल्या निर्णयावर टीकाही झाली.


याची सुरुवात तर माझ्या घरातूनच माझ्या पत्नीने केली. परंतु जॉर्डनला या गेम्सच्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी दिवसातून दहा तास ऑनलाइन बसून प्रॅक्टिस करावी लागते. माझा मुलगा दिवसभर संगणकावर बसून व्हिडिओ गेम्स खेळतो आहे, या माझ्या निर्णयास विरोध होतो आहे. परंतु त्याची शाळा सोडण्याचा निर्णय अभिनय क्षेत्रासाठी अथवा पियानो शिकण्यासाठी अथवा बॉस्केटबॉल शिकण्यासाठी घेतला असता तर कोणी अाक्षेप घेतला नसता. पुस्तके वाचून अभ्यास करणाऱ्यांच्या तुलनेत जॉर्डनला व्हिडिओ गेम्स खेळूनसुद्धा जास्त माहिती असेल, असा त्यांचा दावा आहे. ज्यांना ई-स्पोर्टस म्हणजे गंमत वाटते, त्यांना सांगू इच्छितो, जॉर्डनने वेगवेगळ्या सामन्यांत आतापर्यंत ६० हजार डॉलर (४१ लाख ३५ हजार रुपये)कमावले आहेत. ही रक्कम त्याच्या भवितव्यासाठीच गुंतवणूक करण्यात येईल, असे डेव्हिड यांनी सांगितले.

X