Home | Maharashtra | Vidarva | Akola | Father's dead body found on the third day who pierced in Flood of Purna

तिसऱ्या दिवशी सापडला पूर्णेच्या पुरात वाहून गेलेल्या पित्याचा मृतदेह; जागेवरच केले अंत्यसंस्कार

प्रतिनिधी | Update - Aug 25, 2018, 11:30 AM IST

सेल्फी काढण्याच्या नादात एकाच कुटुंबातील तीन जण पूर्णा नदीच्या पुरात वाहून गेल्याची दुर्देवी घटना २२ ऑगस्ट रोजी घडली होत

  • Father's dead body found on the third day who pierced in Flood of Purna

    संग्रामपूर- सेल्फी काढण्याच्या नादात एकाच कुटुंबातील तीन जण पूर्णा नदीच्या पुरात वाहून गेल्याची दुर्देवी घटना २२ ऑगस्ट रोजी घडली होती. त्यापैकी २३ ऑगस्ट रोजी आईसह मुलाचा मृतदेह सापडला होता. तर तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वडिलांचा मृतदेह आज, २४ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पूर्णा काठावरील माऊली भोटा येथे सापडला आहे. मृतदेह कुजलेला असल्याने घटनास्थळीच पित्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या पुरात एक कुटुंब उद्वस्त झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त येत आहे.


    अकोला जिल्ह्यातील कवठा बहादूरा येथील मूळ रहिवासी असलेले व जळगाव जामोद येथील बुलडाणा अर्बनमध्ये कार्यरत असलेले राजेश गुलाबराव चव्हाण हे २२ ऑगस्ट रोजी आपल्या कुटुंबासह शेगावमार्गे परत येत होते. खिरोडा पुलावर येताच त्यांचा १३ वर्षीय मुलगा श्रावण हा सेल्फी काढत होता. या नादातच तोल गेल्यामुळे तो पूर्णा नदीच्या पुरात पडला. त्याला वाचवण्यासाठी आई सरिता चव्हाण, वय ३९ वर्षे ह्यासुद्धा नदी पात्रात पडल्या. माय-लेकांना वाचवण्यासाठी वडील राजेश चव्हाण यांनी पाण्यात उडी घेतली. परंतु, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तिघेही वाहून गेले. दरम्यान, गुरुवारी रेस्क्यू पथकाच्या कर्मचाऱ्यांनी जवळपास ३५ ते ४० किलोमीटर परिसर पिंजून काढला असता सकाळी १० वाजता आई सरिता चव्हाण यांचा मृतदेह पहुरपूर्णा जवळ तर संध्याकाळी सात वाजता मुलगा श्रावण याचा मृतदेह मानेगाव शिवारात सापडला होता. तर वडील राजेश चव्हाण हे बेपत्ता होते. दरम्यान, आज सकाळीच रेस्क्यू टीमचे राजेश चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी शोध मोहिमेला सुरुवात केली. अथक परिश्रमानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास राजेश चव्हाण यांचा मृतदेह जळगाव जामोद तालुक्यातील माऊली भोटा पूर्णा काठावर आढळून आला. तीन दिवस पाण्यात असल्यामुळे त्यांचा मृतदेह कुजलेला होता. त्यामुळे संध्याकाळी साडे पाच वाजता त्यांच्यावर घटनास्थळीच अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी किशोर केला, संगीतराव भोंगळ यांच्यासह जळगाव व संग्रामपूर तालुक्यातील बुलडाणा अर्बन शाखेचे कर्मचारी, आपात कालीन पथकाचे अभिजित आसोडे, तहसीलदार भूषण अहिरे, नायब तहसीलदार समाधान राठोड, ठाणेदार डी. बी. इंगळे यांच्यासह शेगाव ग्रामीण, जळगाव जामोद व नांदुरा पोलिस व कर्मचारी उपस्थित होते.

Trending