आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज फेडण्यासाठी येथील बाप करत आहेत आपल्याच अल्पवयीन मुलींचा सौदा, 4 महिन्यांत विकल्या 161 मुली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिनेव्हा - युद्ध आणि त्यानंतर सुरू असलेल्या गृहयुद्धात अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था देशोधडीला लागली आहे. त्यातच पडलेल्या दुष्काळाने येथील नागरिकांवर उपसामारीची वेळ आली आहे. कित्येक लोकांनी बँका आणि सावकारांकडून कर्ज घेऊन काही दिवस उदरनिर्वाह केला. परंतु, आता फेडणार कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापैकी अनेक मजबूर आई-वडील आपल्या अल्पवयीन मुलींचा सौदा करत आहेत. संयुक्त राष्ट्रच्या बाल हक्क एजंसीने यावर धक्कादायक अहवाल जाहीर केला. त्यानुसार, कर्ज फेडण्यासाठी आणि उर्वरीत कुटुंबियांचे आणखी काही दिवस पोट भरण्यासाठी गेल्या 4 महिन्यांत 161 अल्पवयीन मुलींची विक्री करण्यत आली आहे. 


युनिसेफच्या प्रवक्त्या एलिसन पार्कर यांनी जिनेव्हा येथे पत्रकारांशी संवाद साधला. अफगाणिस्तानात नागरिकांसह प्रामुख्याने मुला-मुलींची अवस्था अतिशय दयनीय असल्याचे त्यांनी सांगितले. युनिसेफने अफगाणिस्तानात होणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या विक्रीची आकडेवारी गोळा केली. यात जुलै ते ऑक्टोबर पर्यंत 161 अल्पवयीन मुलींची विक्री करण्यात आली. या देशात बालविवाह मोठ्या प्रमाणात केला जातो. यामध्ये अगदी लहान-लहान मुलींचे विवाह प्रौढ किंवा वयोवृद्ध धनाढ्य पुरुषांसोबत केले जातात. यात सर्वच मुलींची विक्री केली जाते आणि त्यांना एका निर्जीव वस्तूसारखी वागणूक मिळते. विकलेल्या मुलींपैकी काहींचा साखरपुडा झाला, काहींचे लग्न झाले तर काही मुली विवाह न करताच पाठवण्यात आल्या आहेत. या सर्वच मुलींची विक्री करून कुटुंबियांनी आप-आपले कर्ज फेडण्याचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न केला. 


काही मुलींचे वय तर अवघ्या महिन्यांचे...
अफगाणमध्ये 80 टक्के नागरिक कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. चांगले पीक आल्यानंतर आपले कर्ज फेडू अशी प्रत्येकाला अपेक्षा होती. परंतु, दुष्काळ पडल्याने त्यांच्याकडे रोजच्या खाण्यासाठीही पैसे नाहीत. अशात दुर्दैवाने घरातील मुलीच कर्ज फेडण्याचे मुख्य साधन बनल्या आहेत. सर्वेक्षणात दिलेल्या माहितीनुसार, यापैकी बऱ्याच मुलींचे वय 11 वर्षे सुद्धा नाहीत. तर काही मुली अवघ्या काही महिन्यांच्या आहेत. पार्कर यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...