ई-कॉमर्सच्या क्षेत्रातील नियमांमुळे / ई-कॉमर्सच्या क्षेत्रातील नियमांमुळे व्यापार करण्याची समान संधी मिळायला हवी; एफडीआय नियम बदल निराशाजनक : वॉलमार्ट 

Feb 21,2019 08:21:00 AM IST

नवी दिल्ली- भारतात ई-कॉमर्स कंपन्यांसाठीच्या एफडीआय धोरणातील बदलामुळे आम्ही निराशा असलो तरी भारतीय बाजारात आमचा आत्मविश्वास कमी झाला नसल्याचे अमेरिकेतील रिटेल कंपनी वॉलमार्टने म्हटले आहे. सर्वांना समान व्यापार करण्याची संधी मिळावी, असे नियम तयार करायला हवेत, असेही मत वॉलमार्टने व्यक्त केले आहे. जगातील सर्वात मोठ्या या रिटेल कंपनीने मागील वर्षी फ्लिपकार्टमध्ये १६ अब्ज डॉलरची (१.१४ लाख कोटी रुपये) गुंतवणूक करून ७७ टक्के भागीदारी घेतली होती.


नवीन नियमांनुसार विदेशी गुंतवणूक असलेल्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवर भारतात एक फेब्रुवारीपासून स्वत:ची भागीदारी असलेल्या कंपनीच्या उत्पादनांची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर कोणत्याही उत्पादनाच्या एक्सक्लुझिव्ह विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. वॉलमार्टचे अध्यक्ष, सीईओ आणि संचालक सी. डग्लस मॅकमिलन यांनी सांगितले की, भारतीय बाजाराचा आकार पाहता आमची आशा कायम आहे. सध्या भारतात ई-कॉमर्स उद्योग सर्वदूर पसरलेला नाही. त्यामुळे आमच्यासाठी अनेक संधी आहेत.'

नियमात बदलासंदर्भात त्यांनी सांगितले की, होणे निराशाजनक आहे. मात्र, यामुळे दीर्घ काळातील कंपनीच्या संधींवर परिणाम होणार नाही. ही एक तिमाही किंवा एका वर्षासाठीची बाब नाही. भविष्यात विकासासाठी अनुकूल नियम बनवण्यासाठी सरकार सहयोग करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

९ महिन्यांत एफडीआयमध्ये ७ टक्क्यांची घट
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांत प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (एफडीआय) सात टक्के कमी झाली आहे. वाणिज्य मंत्रालयानुसार एप्रिल-डिसेंबरदरम्यान ३३.४९ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक झाली आहे. एप्रिल-डिसेंबर २०१७ मध्ये ३५.९४ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक झाली होती.

X