आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : ५०० गावांत टंचाईची भीती; मुख्यमंत्र्यांनी घोषणेचा मुहूर्तच बदलला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबाद जिल्ह्यातील १३५४ गावांपैकी ५०० हून अधिक म्हणजे तब्बल ३७% गावांत यंदा पाणी टंचाई भासेल, याचा अंदाज मुख्यमंत्र्यांना बुधवारी येथे आढावा बैठकीत आला. त्यामुळे डिसेंबरअखेर टंचाईची घोषणा केली जाईल ही गेल्या रविवारी (दि. ७)लातूरमध्ये केलेली घोषणा दोनच दिवसांत बदलून त्यांनी त्यासाठी आता ३१ आॅक्टोबरचा मुहुर्त जाहीर केला. ३१ तारखेनंतर टंचाईवरील उपाययोजना लगेच सुरू केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. अर्थात, निकषांनुसारच कारवाई केली जाईल, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.


यंदा प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हानिहाय आढावा बैठका घेत आहेत. बुधवारी औरंगाबादला झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. टंचाईची भीती असलेल्या जिल्ह्यातील गावांसाठी पाणीपुरवठ्याची तयारी आतापासून सुरू करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. दुष्काळ असलेल्या गावात वीज भारनियमन करू नये, अशा सूचना आपण महावितरणला देणार आहोत, असेही त्यांनी जाहीर केले. जिल्ह्यात केवळ ५६ टक्केच पाऊस झाला असून १६० टँकर्स आताच सुरू आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ. दीपक सावंत, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचीही उपस्थिती होती. त्यानंतर त्यांनी महापालिका आणि पोलीस विभागाचाही आढावा घेतला. 


मंत्रिपदासाठी तुमचा काैल घेताे 
राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू अाहे. या पार्श्वभूमीवर अाैरंगाबादेतून काेणाला संधी देणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर 'तुम्हा सर्वांचा कौल घेऊन निर्णय घेतो,' असे म्हणत फडणवीसांनी या प्रश्नावर अधिक बाेलणे टाळले. 


मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, आमदार अतुल सावे, प्रशांत बंब, इम्तियाज जलील, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांचीही यावेळी उपस्थिती होती. 


डिसेंबरअखेर पुन्हा घेणार चालू असलेल्या विविध योजनांचा सखोल आढावा
मुख्यमंत्र्यांनी तालुकानिहाय आढावा घेत त्याची माहिती दिली. ते म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेत १० हजाराचे उदिष्ट असून ६ हजार घरे पूर्ण झाली. उर्वरित मार्चपर्यंत होतील. १०,२०८ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून आणखी दहा हजारांचे उदिष्ट आहे. ३ लाख ७० हजार ९४५ लोकांना १८७२ कोटीचे मुद्रा लोन दिले आहे. मंजूर ५७५ पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर आहेत. जूनपर्यत आणखी १२६ योजना पूर्ण करण्यास सांगितले आहे. 


ग्रामसडक योजनेच्या कामांबद्दल नाराजी
ग्रामसडक योजनेत ७०० किलोमीटरपैकी फक्त १४० किमीचे काम पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. बहुतांश योजनेत सिल्लोड, फुलंब्री, सोयगाव तालुके पिछाडीवर आहेत. बळीराजा सिंचन, धरणांचा गाळ काढणे अशा योजनांचा डिसेंबरमध्ये पुन्हा आढावा घेऊ, असे ते म्हणाले. 

 

३१ तारखेपर्यंत टंंचाईची घाेषणा, नंतर दुष्काळ निवारणाचे करणार उपाय
३१ ऑक्टोबरपर्यंत टंचाई घोषित केली जाईल. त्यानंतर दुष्काळ निवारण  उपाययोजना लागू केल्या जातील,’ असे मुख्यमंत्री म्हणाले. खुल्या बाजारातून वीज खरेदीसाठी कायमस्वरूपी धोरण निश्चित केले जात आहे, असेही ते म्हणाले. पाण्याअभावी काही वीज उपकेंद्रे बंद करावी लागण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.  जलयुक्त शिवारमध्ये निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल होतील, असेही ते म्हणाले.


अजित पवारांना सध्या तेवढेच काम   
‘दुष्काळ सोडून फडणवीस २०१९ नंतर मीच मुख्यमंत्री असे सांगत फिरताहेत,’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी औरंगाबादेत केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, ‘सध्या पवारांना टीका करण्याचेच काम आहे. दुष्काळ जाहीर करण्याचे निकष आहेत. त्यानुसारच कारवाई होईल.’


मंत्र्यांना दिले वेळापत्रक
पाणीटंचाईची तालुक्यात प्रत्यक्ष पाहणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश असून मंत्री चंद्रकांत पाटील व दिवाकर रावते यांनी पालकमंत्र्यांच्या दाैऱ्याचे वेळापत्रक तयार केले आहे.  किमान पाच तालुक्यात जाऊन मंत्र्यांना जनतेशी संवाद साधावा लागणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...