आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
गुजरातच्या सहलीवर आम्ही पंधरा व्यक्तींचा ग्रुप घेऊन निघालो होतो. सुमारे 10 ते 12 दिवसांची ही सहल होती. आमच्या नात्यातील एकाचे पुतणे तिकडे अधीक्षक अभियंता आहेत. त्यांच्यामुळेच सरदार सरोवराला राहण्यासाठी विश्रामगृह मिळाले. त्यामुळे तेथील बोगद्यात असलेले वीजनिर्मिती केंद्रही पाहण्यात आले. अहमदाबाद शहर पाहून झाल्यावर आमच्यातील दुस-या एका नातेवाइकाचे परिचित कुटुंब सुरतला राहत होते. सुरतहून परतीचा 725 कि.मी.चा प्रवास एका दिवसात करणे शक्य नाही, म्हणून आम्ही सुरतला मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा जोशी यांनी त्या परिचितांना फोन लावला आणि एखाद्या लॉजमध्ये आमची राहण्याची सोय करून देण्याची विनंती केली. त्यांनी जोशींना म्हटले, ‘तुम्हा लोकांना लॉजमध्ये राहण्याची काही गरज नाही. आमचे क्वार्टर खूप मोठे आहे. शिवाय आम्ही पती-पत्नीच यात राहतो आहोत. शेजारी माझ्या सहका-या चेही निवासस्थान रिकामेच आहे. त्यामुळे कोणताही संकोच न करता या. येथे राहण्याची मी सोय करतो आहे.’
शिवाय ते आमच्या वाहनाचा क्रमांक विचारून ठरलेल्या ठिकाणी घ्यायला आले. पंधरा लोकांची जेवणाची सोय केली. निवासाची सोय केली. त्यांचे आदरातिथ्य पाहून आम्हालाच दडपल्यासारखे झाले. नातेसंबंध नसताना त्यांनी अत्यंत कमी वेळात आपुलकीने सर्व सोय केली. केवळ आपल्या महाराष्ट्रा तील लोक परप्रांतात भेटले, हीच भावना त्यामागे असावी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.