आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतराव्या वेळेला महिला गराेदर; आरोग्य यंत्रणेने पालावर जाऊन केले उपचार!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 माजलगाव -  शहरापासून जवळ असलेल्या केसापुरी कॅम्प भागात पालावर राहणारी एक महिला १७ व्या वेळेस गरोदर असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी समोर आणल्यानंतर रविवारी आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पथकाने थेट पालावर जाऊन या महिलेला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, १० व्या वेळेला गर्भवती राहिलेल्या मीरा एखंडे या महिलेचा वर्षभरापूर्वीच प्रसूतीदरम्यान अति रक्तस्रावाने मृत्यू झाल्याची घटना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात घडलेली होती.  हे  प्रकरण वादग्रस्त ठरले होते. यामुळे या महिलेच्या बाबतीत आरोग्य विभागाने काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. 

माजलगाव शहरातील केसापुरी कॅम्प परिसरात अनेक भटके लोक पाल ठोकून राहतात. कचरा वेचून उपजीविका भागवणारे हे अशिक्षित लोक आहेत. दरम्यान, या पालावर राहणारी लंकाबाई सिकंदर खरात (४०) ही महिला तब्बल १७ व्यांदा गरोदर असल्याची बाब सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणून 
दिली. यानंतर रविवारी आरोग्य विभागाची धावपळ उडाली. सकाळी सात वाजताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अनिल परदेशी यांच्यासह  ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गजानन रूद्रवार, सादोळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.दत्तात्रय पारगावकर व परिचारिकांनी लंकाबाईची भेट घेतली. तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
 
 

स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी
दरम्यान, लंकाबाई यांची डॉ. प्रियंका राजेभोसले या स्त्री रोग तज्ज्ञांनी तपासणी केली. तिची सोनोग्राफी करण्यात आली. रक्ताच्या तपासण्याही करण्यात आल्या आहेत. पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला व पत्र त्यांना दिले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. परदेशी यांनी सांगितले. मात्र, रविवारी ही महिला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल झाली नव्हती.

दोन महिने निगराणीखाली ?
लंकाबाईंना ७ वा महिना सुरू असून त्या आरोग्य विभागाच्या दृष्टीने अती जोखमीच्या रुग्ण आहेत. त्यांना पुढील दोन महिने जिल्हा रुग्णालयात निगराणीखाली ठेऊन त्यांची प्रसूती करण्याचा विचार सुरू असला तरी उपजीविकेसाठी काम करणे अपरिहार्य असल्याने दोन महिने सक्त विश्रांती घेण्यास लंकाबाई तयार नाहीत. 

बातम्या आणखी आहेत...