आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या एव्हरेस्टवर चढाईची सर्वांची इच्छा असते, तेथे मी थेट उतरते : प्रिया अधिकारी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काठमांडू - ३१ वर्षीय प्रिया अधिकारी नेपाळच्या एकमेव महिला रेस्क्यू पायलट आहेत.त्या एव्हरेस्टच्या ८००० मीटर उंच शिखरांवर हेलिकॉप्टर उडवून लोकांचे प्राण वाचवतात आणि मदत करतात. प्रिया यांना डॉक्टर व्हायचे होते, पण एका भेटीने त्यांना पायलट होण्यासाठी प्रेरित केले. रेस्क्यू पायलटची जी ड्यूटी अर्ध्यापेक्षा जास्त महिला सोडून जातात, तिथे प्रियंका सध्या ३० पुरुषांत एकमेव महिला आहे. त्यांनी ९ वर्षांत १००० पेक्षा जास्त लोकांना एव्हरेस्टच्या धोकादायक पर्वत आणि भागांतून वाचवले आहे. नेपाळच्या भूकंपात सतत एक महिना त्यांनी लोकांना वाचवले. प्रिया अधिकारी यांच्याशी त्यांच्या आतापर्यंतच्या उड्डाणाबाबत उपमिता वाजपेयी यांनी चर्चा केली....

 

> भारतात मेडिकलच्या शिक्षणापासून अचानक रेस्क्यू पायलट होण्यापर्यंतचा प्रवास कसा झाला?
हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी मेडिकलमध्ये प्रवेशासाठी भारतात (आंध्र प्रदेश) आले होते. प्रवेश प्रक्रिया सुरू असतानाच घरून फोन आला की आईची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे मला परतावे लागले. आईची तब्येत ठीक झाल्यानंतर मी काठमांडूमध्येच बुद्धा एअरलाइन्समध्ये केबिन क्रूची नोकरी करू लागले. नंतर बीएस्सी, एमबीएही केले. एक दिवस एका पार्टीत माझ्या भावाने मला त्याच्या मित्राची भेट घालून दिली. तो हेलिकॉप्टर पायलट होता. त्याने मला आपल्यासोबत फ्लाइंगवर येण्यास सांगितले. मी तयार झाले. ही माझी पहिली हेलिकॉप्टर राइड होती. घरी येऊन मी आईला म्हटले, कर्ज घेऊन, पण पायलटच होईन. पहिल्या राइडनंतर ४ महिन्यांनी मी हेलिकॉप्टर चालवत होते.


> एकटी मुलगी, पर्वतात कसे उड्डाण करता, कोणी काही म्हटले नाही?
मी मुलगी आहे, त्यामुळे हे काम करू शकणार नाही असे कधीही माझ्या मनात आले नाही. मात्र, स्वत:च्या सुरक्षेसाठी मी बॉक्सिंग शिकणे सुरू केले. ५ वर्षांपासून जेव्हा काठमांडूत असते तेव्हा सकाळी एक-दीड तास बॉक्सिंग करते. रोज योगही करते. माझ्या खिशात नेहमी एक चाकूही असतो. त्याची आजवर गरज पडली नाही. मी नशेतील प्रवाशाला चॉपरमध्ये चढू देत नाही.


> एव्हरेस्टची एकमेव महिला रेस्क्यू पायलट, तुम्ही जगातील सर्वात उंच शिखराकडे कसे पाहता?
एव्हरेस्टवर जाणे मुलांचा खेळ नाही. पण मी अनेकदा अशा क्लाइम्बर्सना भेटते जे काहीही विचार न करता येथे येतात. मला स्वत:ला कधीही ही चढाई करायची नाही. पण जेथे सर्व जण चढाई करतात तेथे मी थेट उतरते याचा आनंद आहे.


> मोठ्या आव्हानाचा सामना केला अशी मोहीम?
एकदा १४ हजार फूट उंचीवर बेस होता. तेथे ५०० किलो साहित्य पोहोचवायचे होते. साहित्य ऑफलोड करण्यास क्रूही नव्हता. म्हणजे पायलटही मी आणि साहित्य चढवणे, उतरवणेही माझी जबाबदारी माझीच. २०१५ मध्ये जेव्हा नेपाळमध्ये भूकंप आला तेव्हा अनेक महिने १०-१० फेऱ्या केल्या.


> नेपाळमध्ये भूकंपाच्या वेळी मोहीम किती कठीण होती?
भूकंपाच्या दुसऱ्या दिवशी पहिले रेस्क्यू लँडिंग ज्या ठिकाणी केले तेथे अचानक १०० लोक चॉपरमध्ये घुसू लागले. रस्ते बंद होते, लोक अडकले होते. मी आधी ज्येष्ठांना, मुलांना वाचवले. इतर लोकांना म्हटले, तुम्ही कुटुंबीयांचा नंबर मला लिहून द्या. काठमांडूला परतून मी प्रत्येक कुटुंबाला फोन करून त्यांचे आप्त सुरक्षित असल्याचे क‌ळवले.


> रेस्क्यू आणि टुरिझम फ्लाय यात फरक काय?
फ्लाइट पर्यटनासाठी असेल तर हवामान खराब असताना आम्ही उड्डाण करत नाही. रेस्क्यूसाठी हवामानाकडे दुर्लक्ष करावे लागते. अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्याकडेच लक्ष असते.

 

> तुम्ही एकदा सौंदर्य स्पर्धेतही सहभागी झाल्या होत्या?
हो, केबिन क्रू असताना एका स्पर्धेत गेले होते. आम्ही ५ बहिणी. एका मुलीने ब्यूटी क्वीन व्हावी अशी आईची इच्छा होती. इतर चौघी गेल्या नाहीत त्यामुळे मी गेले. पण स्पर्धा २ महिन्यांतच रद्द झाली.


> आता भविष्यातील योजना काय आहे?
मला जगातील सर्वात वृद्ध पायलट व्हायचे आहे. ६० व्या वर्षीही हेलिकॉप्टर उडवायचे आहे. सध्या उड्डाणादरम्यानच दोराने साहित्य आणि लोकांना चढवले-उतरवले जाण्याचे प्रशिक्षण घ्यायचेय.


> तुमचे प्रेरणास्थान कोण आहे?
कोणी कोणाला प्रेरित करू शकते, असे मला वाटत नाही. तुम्हालाच स्वत:ला सर्व करावे लागते. पायलटच राहावे, असे मला वाटत होते. ज्या प्रकारे  प्रियंका चोप्राने लग्न, करिअर, वाद हॅँडल केले, मलाही तसेच व्हावे वाटते.

 

> मुलगी असल्यामुळे आपण वेगळे आहोत असे केव्हा वाटले?
ए‌व्हरेस्ट बेस कॅम्पमध्ये थांबणे थोडे वेगळे असते. हवामानाने साथ दिली नाही तर अनेक दिवस बेस कॅम्पच्या टेंटमध्ये राहावे लागते. तेथे माझ्याशिवाय सर्व शेरपा असतात. पण मग माझ्यासोबत चाकू असतोच. नेपाळ आणि भारतात समाज जवळपास सारखाच विचार करतो. मी पायलट होण्यास त्यांचीही आक्षेप होता. ३-४ मुली तर प्रशिक्षणातून परतल्या. हेच कारण आहे की मी आज एकमेव रेस्क्यू पायलट आहे. याउलट ३० पुरुष हे काम करतात. 

बातम्या आणखी आहेत...