आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रानडुकरांपासून पीक वाचवण्यासाठी दीडशे साड्यांपासून बनवले कुंपण; राक्षसभुवन येथील शेतकरी शेळके यांचा प्रयोग चर्चेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई - भुईमुग, ऊस, कापूस अशी कोवळी पीकं  रानडुकरे रातोरात उद‌्ध्वस्त करतात. या संकटावर मात करण्यासाठी राक्षसभुवन (ता.गेवराई) येथील शेतकऱ्याने तामिळनाडूतील शेतकऱ्याने वापरलेली ‘कुंपण साड्यांची’ शक्कल वापरली. सहा हजार रुपये खर्च करून दीडशे साड्या विकत घेऊन त्यांचे कुंपण बनवले. त्यामुळे रानडुकरे इकडे फिरकतच नसल्याचा त्यांचा अनुभव आहे.


राक्षसभुवन येथील शेतकरी अशोक शेळके यांचे पाच एकर क्षेत्र आहे. याठिकाणी तीन एकर ऊस व दोन एकर कपाशीची लागवड केली. गतवर्षीच्या दुष्काळातून कसेबसे सावरत त्यांनी पेरा उरकला. मात्र, या शिवारात रानडुक्कर, हरणांनी धुडगुस घालत कोवळी पिकं उद‌्ध्वस्त करायला सुरुवात केली. गतवर्षी त्यांना याच त्रासामुळे कपाशीचा दुबार पेरा करावा लागला होता. यंदा हे नुकसान टाळण्यासाठी काय करता येईल, असा विचार करत शेळकेंनी इंटरनेटवर शोधाशोध केली. यात तामिळनाडूतील एका शेतकऱ्याने साड्यांचे कुंपण तयार करत पिकांचा बचाव केल्याची चित्रफीत त्यांना पहायला मिळाली.  अशोक यांनीही असे कुंपण तयार करायचे ठरवले. लगोलग  बीड येथे जाऊन जवळपास दीडशे जुन्या साड्या प्रति २० रुपये प्रमाणे खरेदी केल्या.  दोन क्विंटल लाकडे, १३ किलो तार असे साहित्य जुळवले. गावातील एका टेलरकडून या साड्या जोडून घेतल्या. सहा हजार रुपयांत अशोक यांनी पाच एकर क्षेत्राला कुंपण घातले. आता या साड्यांची रचना अशा पद्धतीने केली की वाऱ्याने सारखा फडफड आवाज येतो. आठ दिवसांपूर्वी हे कुंपण घातल्यापासून त्यांच्या शिवारात ना रानडुकरे आली ना हरीण. इंटरनेटवर पाहिलेली चित्रफीत, स्वत:ची कल्पकता व सहा हजार रुपये खर्चातून अशोक यांनी साधलेला हा प्रयोग पिकांचे नुकसान रोखणारा ठरला आहे.
 

 

यापूर्वीही अनेक प्रयोग राबवले गेले
शेतकऱ्यांनी रानडुकरांपासून पिके वाचवण्यासाठी अनेक प्रयोग केले. यात तारेचे कुंपण लावून रात्री विद्युत प्रवाह सोडण्याचा धोकादायक प्रयोग, टेबल फॅनचे पाते व परात वापरून तयार केलेेले उपकरण, बांधाभोवती काचा टाकणे असे अनेक प्रयोग होते. गतवर्षी आमदार सुरेश धस यांनी आष्टी मतदारसंघात विशेष परवानगी व हैदराबादहून शार्प शूटर बोलावून रानडुकरांची संख्या कमी करण्याची मोहीमही हाती घेतली होती. अशा विविध प्रयोगांत कमी अधिक प्रमाणात यश मिळाले. अशोक शेळके यांचा साडीच्या कुंपणाचा प्रयोग सध्या चर्चेत आहे.

 

शेतकऱ्यांनाही रानडुकरांचा धाेका
काॅटन हब असलेल्या गेवराईत यंदा १ लाख २० हजार हेक्टर खरीप क्षेत्राचा विचार करता पावसाअभावी केवळ ७० टक्के क्षेत्रावर पेरा झाला आहे. त्यातही राक्षसभुवन, गुळज, पांचाळेश्वर, मालेगाव, उमापुर, गढी, मिरकाळा, वडगांव ढोक, पाचेगाव, सिरसदेवी, रांजणी, मादळमोही, जव्हारवाडी, गोविंदवाडी, कोळगाव, तांदळा, चकलांबा, सुशी वडगाव, तळण्याचीवाडी, धोंडराई या भागांत शेतीला रानडुकरांचा उपद्रव आहे. या भागात भुईमूग, मका, यासह उगवून आलेला कापूस, ऊस या पिकांनाही धोका राहतो. रात्री शिवारात राखणीस असलेल्या शेतकऱ्यांवर रानडुकरांनी हल्ला केल्याच्याही घटना परिसरात घडलेल्या आहेत.

 

आम्हीही जनजागृती करतो : रानडुकरांमुळे होणारे नुकसान राेखण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देतो. शेणामध्ये तिखट मिरची मिक्स करून त्याच्या गोवऱ्या करून शेतात हवेच्या दिशेने धुर केल्यास वन्यप्राणी तिथे येत नाहीत. यासह ऑईल वंगणात तिखट मिरची पावडर मिक्स करून गोणीवर टाकावे. ते हवेच्या दिशेने ठेवल्यास  उग्र वासाने प्राणी  येत नाहीत, असे वनरक्षक देविदास गाडेकर यांनी सांगितले.

 

रानडुकरांच्या भीतीने भुईमुगाचे क्षेत्र घटले : रानडुकरांचा सर्वाधिक त्रास  भुईमुगाच्या पिकाला होतो. दशकभरापूर्वी जिल्ह्यात १५ हजार हेक्टरवर भुईमुगाचा पेरा होत होता. वर्षानुवर्षे हे क्षेत्र घटत आहे. त्याला जसे पाऊस कारणीभूत आहे, तसाच रानडुकरांचा त्रासही. यंदा जिल्ह्यात २२८६ हेक्टरवर भुईमुगाचा पेरा झाल्याची नोंद आहे. 

बातम्या आणखी आहेत...