आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसामुळे फर्टिलायझर कंपनीची भिंत कोसळल्याने 23 शेळ्या दगावल्या; संसार उपयोगी साहित्यासह 3 लाख 23 हजारांचे नुकसान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सम्मेद शहा

मोहोळ - कोळेगाव ता मोहोळ येथील वर्धमान फर्टिलायझर अँड सिड्स कंपनी अनेक दिवसांपासून  बंद असल्याने परिसरात सुबाभळीच्या मुळ्या संरक्षक भिंतीत वाढत होत्या. बुधवार (दि 25) रोजी सायंकाळी पाऊस झाल्याने कंपनीची संरक्षक भिंत कोसळून धनाजी खरात या शेतमजूर शेतकऱ्याच्या २७ शेळ्या व एक खोंड दगावले, तर घरातील तिघेजण जखमी झाल्याची घटना घडली. मोहोळचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी रात्री उशिरा घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.  
 

3 लाख 23 हजारांचे नुकसान 
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गलगत वर्धमान कंपनीच्या पाठीमागील बाजुस कोळेगाव गट नं 136 मध्ये राहत्या घराच्या शेजारील अंगणात ही हृदय पिळवणारी घटना पाहून प्रत्येक जण हळहळत होता. मुक्या जीवाची अशी भयानक घटना घडल्याने अनेक ग्रामस्थांनी खरात कुटुंबाला मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान गुरुवारी सकाळी गावकामगार तलाठी एस.बी. कांबळे व मंडळ अधिकारी जी.एन. कदम यांनी पंचनामा केला. त्यामध्ये 27 शेळ्या दगावल्याचे व एक खिलार जातीचे खोंडाच मृत्यू झाला. तसेच पत्राशेड व संसारूपयोगी साहित्य असे एकूण 3 लाख 23 हजार रुपयांचे नुकसान दाखविले आहे. तसेच तालुका पशुवैद्यकीय अधिकारी ओमप्रकाश सोनाळे यांनी मयत शेळ्यांचे पोस्टमोर्टम केले. वडील हनुमंत खरात, आजी कमल खरात, भाऊ तानाजी खरात यांच्यावर शासकीय रुग्णालय सोलापूर येथे उपचार सुरु आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे मनोज शेजवल व इतर राजकीय नेत्यांनी घटनास्थळी भेट दिली. 
 

होत्याचे नव्हते झाले
धनाजी खरात यांना वडिलोपार्जित दोन एकर शेती आहे. उत्पनाचे दुसरे काही साधन नाही म्हणून मजुरी करत शेळ्या पालनाचा व्यवसाय सुरु केला. वडील मजुरी करतात तर भाऊ इंजिनिअरिंग शिकत आहे. आई हयात नसल्याने आजी स्वयंपाक करून घालते. आमचे कुटुंब चार जणांचे, काळाने घाला घातल्याने होत्याचे नव्हते झाले. असा आर्त टाहो फोडत खरात घटनास्थळी विव्हळत होता.