आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बेरोजगार लाठ्यांनी मारतील’ या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर शुक्रवारी लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधकांत हमरातुमरी झाली. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राहुल यांच्या वक्तव्याचा निषेध केला. आक्रमक झालेले काँग्रेस खासदार मणिकम टागोर हे सत्ताधारी सदस्यांच्या आसनांपर्यंत पोहोचले.
काँग्रेस खासदारांनी हर्षवर्धन यांना कडाडून विरोध केला. मणिकम टागोर तर थेट सत्ताधारी खासदारांच्या आसनांकडे गेले आणि दुसऱ्या रांगेत बसलेल्या हर्षवर्धन यांच्याकडे पाहून आक्रमकरीत्या हातवारे करू लागले. इतक्यात यूपीतील भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरणसिंह यांनी टागोरांना पकडून मागे हटवले. स्मृती इराणींसह अनेक मंत्री, भाजप खासदार आणि काँग्रेस सदस्य हिबी इडेन यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. गदारोळ वाढत असल्याचे दिसताच लोकसभा अध्यक्षांनी लोकसभेचे कामकाज १ वाजेपर्यंत तहकूब केले. ते पुन्हा सुरू झाल्यानंतरही गदारोळ सुरूच राहिला. यामुळे कामकाज आधी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
राहुल म्हणाले, मोदींचे वर्तन पंतप्रधानांसारखे नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘ट्यूबलाइट’बाबतच्या वक्तव्यावर राहुल गांधी म्हणाले, ‘त्यांचे वर्तन पंतप्रधानांसारखे नाही. लोकसभेत आम्हाला बोलण्यापासून रोखले जात आहे. मी सरकारला प्रश्न विचारू नये म्हणून आज लोकसभेत जाणूनबुजून गोंधळ केला. बेरोजगारीवर मोदी बोलू शकत नाहीत. त्यांच्या बचावासाठी भाजप चर्चांत अडथळा आणत राहील.’
हर्षवर्धन यांच्यावरून वाद
राहुल यांनी मेडिकल कॉलेजबाबत प्रश्न विचारला. उत्तरात मंत्री हर्षवर्धन म्हणाले, आधी मी राहुल यांनी मोदींबाबत वापरलेल्या विचित्र शब्दांचा निषेध करतो. राहुल यांचे वडीलही पंतप्रधान होते. आमच्या पक्षाने त्यांच्याविरुद्ध अशी विचित्र वैयक्तिक टिप्पणी कधीच केली नाही. संसदेने त्यांचा निषेध करावा.’
हर्षवर्धन : माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न, राहुलनी माफी मागावी
काँग्रेस सदस्यांनी सभागृहात कामकाज सुरू असताना माझ्या आसनाजवळ येत माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. तसेच काही सदस्यांनी तर माझी कागदपत्रे हिसकावण्याचा प्रयत्न केला. या वागण्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे.
- हर्षवर्धन, केंद्रीय आरोग्यमंत्री
राहुल यांच्या सांगण्यावरूनच सभागृहात घातला गोंधळ
टागोर यांची कृत्ये म्हणजे गुंडगिरीची परिसीमा आहे. राहुल गांधी यांच्या सांगण्यावरूनच या सदस्यांनी सभागृहात हा अशोभनीय प्रकार केला आहे. मंत्री हर्षवर्धन यांच्याशी बाचाबाचीचा प्रयत्न करण्यात आला. हे काँग्रेसच्या नैराश्याची पातळी दाखवते.
- प्रल्हाद जोशी, संसदीय कामकाज मंत्री
काँग्रेसचा आरोप : सभागृहात घडले ते सर्व सुनियोजित होते
हर्षवर्धन उत्तर देण्याऐवजी राहुल यांच्या वक्तव्याचा निषेध करत होते. त्याचा प्रश्नाशी संबंध नव्हता. समजा मोदी संसदेबाहेर बोलले तर आम्ही सभागृहात काही विचारू शकतो का? मंत्री कागद काढून वाचू लागतात, हे आश्चर्यकारक आहे. हे सर्व सुनियोजित वाटते.
- अधीर रंजन चौधरी, काँग्रेस
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.