आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Fight Between Two Friends While Celebrating Thirty First

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थर्टी फर्स्ट साजरा करताना दोन मित्रांमध्ये मारामारी; गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा संशय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी- थर्टी फर्स्ट साजरा करताना दोन युवकांची मारामारी होऊन एकजण जखमी झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्री शहरातील शेवगाव रस्त्यावर घडली. जखमीला नगर येथे हलवण्यात आले आहे. या प्रकरणात गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना समजल्याने मंगळवारी सायंकाळी उशिरा पोलिसांचे एक पथक नगरला रवाना झाले. सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी कोणत्याही गुन्ह्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आलेली नव्हती. एकमेकांचे मित्र असलेले दोन तरुण थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी सोमवारी रात्री भेटले. या दोघांमध्ये वाद होऊन त्यांच्यात मारामारी झाली. यात एक जण जखमी झाल्याने त्याला नगरला हलवण्यात आले. 

 

मंगळवारी सकाळी या प्रकरणाची शहरात चर्चा सुरु झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची सखोल माहिती घेतली असता या घटनेतील एका युवकाने आपल्याकडील गावठी कट्ट्याने गोळीबार केल्याचे समजले. झाडलेली गोळी दुसऱ्या तरुणाच्या हाताला चाटून गेली असल्याचे समजल्यावर पोलिसांनी या प्रकरणाची माहिती घेत गोळीबार करणाऱ्या तरुणाच्या घरी जाऊन झडती घेतली असता हा तरुण व गावठी कट्टा सापडला नाही. 

 

त्यानंतर सायंकाळी उशिरा स्थानिक पोलिसांचे एक पथक नगरला रवाना झाले असून जखमी तरुणाचा ते जबाब घेणार आहेत. या संदर्भात पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांना विचारले असता या प्रकरणात गावठी कट्ट्याचा वापर झाला की, एअरगनचा वापर झाला हे समजू शकलेले नाही. पोलिसांचे एक पथक जखमी युवकाकडे चौकशी करण्यासाठी नगर येथे पाठवण्यात आले आहे. त्यानंतर काय तो सर्व प्रकार उघडकीस येईल, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणी सध्या शहर व तालुक्यात मोठी चर्चा सुरू आहे.