आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राममंदिर निर्माणासाठी तीन ट्रस्टमध्ये चढाओढ, मशीदीसाठीही ट्रस्टची मागणी  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयाेध्या/लखनऊ - अयोध्येत रामजन्मभूमीवर मंदिर निर्माणासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या ट्रस्टमध्ये सहभागी होण्यासाठी अयोध्येतील साधू-संतांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. मंदिरासाठी अयोध्येतील तीन जुन्या ट्रस्टनादेखील मंदिर निर्माणाची जबाबदारी हवी आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मंदिराच्या निर्माणासाठी तीन महिन्यांत ट्रस्ट स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

मंदिर आंदोलनाशी संबंधित श्रीराम जन्मभूमी न्यासचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांनी सांगितले की, मंदिर निर्माणासाठी आधीपासूनच ट्रस्ट आहे. नवीन बनवण्याची आवश्यकता नाही. गरज असेल त्याप्रमाणे त्यात नवीन सदस्य घेता येतील. विहिंपशी संबंधित असलेल्या या ट्रस्टच्या नेतृत्वात मंदिरासाठी दगड कोरले जात आहेत.

१९९५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी मंदिर निर्माणासाठी द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांच्या नेतृत्वात रामालय ट्रस्ट स्थापन केला होता. २५ साधू-संत असलेल्या या ट्रस्टचे सचिव अविमुक्तेश्वरानंद सांगतात की, मंदिर निर्माणाचे काम त्यांच्या ट्रस्टमार्फत व्हायला हवे. यासाठी ते पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. या ट्रस्टशी संबंधित अखिल भारतीय श्रीराम जन्मभूमी पुनरुद्धार समिती खटल्यात पक्षकार होती. तसेच श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण न्यासालादेखील मंदिर निर्माणाची जबाबदारी हवी आहे. दुसरीकडे दिगंबर आखाड्याचे प्रमुख महंत सुरेश दास यांनी सांगितले की, नवीन ट्रस्ट स्थापन करणे सरकारची जबाबदारी आहे, रामजन्मभूमी न्यासाची नाही. नवीन ट्रस्टमध्ये प्रत्येक ट्रस्टचा प्रतिनिधी हवा. निर्मोही आखाड्याचे प्रमुख महंत धीरेंद्र दास यांनी नवीन ट्रस्ट स्थापन करण्याचे सांगितले, पण त्यात सहभागी होण्याबाबत काही बोलले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने निर्मोही आखाड्याला नव्या ट्रस्टमध्ये सामील करून घेण्याचे निर्देश दिले आहेत.दरम्यान, अयोध्या वादाशी संबंधित पक्षकार रमेशचंद्र त्रिपाठी यांचे मंगळवारी निधन झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ते उत्साहात असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले, तर अठरा वर्षांपूर्वी मंदिर निर्माण होईपर्यंत चप्पल न घालण्याची शपथ बिहारमधील रामभक्त देवदास यांनी घेतली होती.हनुमानगढीच्या महंतांनी राममंदिरासाठीच्या प्रस्तावित ट्रस्टमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक असलेल्यांना संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. सरकारवर कोणताही दबाव टाकण्यात येऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे. सरकारला मुक्तपणे काम करू द्यावे.

 

मशीदीसाठीही ट्रस्टची मागणी

मशीद उभारण्यासाठीही ट्रस्ट स्थापन करण्याची मागणी पुढे आली आहे. काँग्रेसमधून भाजपत आलेले अम्मार रिझवी यांनी यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. मशिदीचे पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी म्हटले की, पाच एकर जागेवर मशीद उभारण्यासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्यात यावा.

पाच राज्यांतील जादा सुरक्षा मागे


अयोध्येवरील निकालानंतर देशभरात स्थिती सामान्य राहिल्याने लेलेपाच राज्यांमध्ये तैनात करण्यात आलेली जादा सुरक्षा दल हटवण्यात आले आहे. मध्य प्रदेश, तेलंगणा, दिल्ली आणि गुजरातमधील सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर गृह मंत्रालयाच्या निर्देशावरून सुरक्षा हटवण्यात आली. निकालानंतर अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या सतत वाढत आहे. सकाळ-संध्याकाळ भाविकांच्या रांगा लागत आहेत. कसून तपासणी केल्यानंतर भक्तांना प्रवेश देण्यात येत आहे.विहिंपने घडवलेले दगड मंदिरात वापरावेत

रामजन्मभूमी न्यासाच्या मॉडेलवरच मंदिर उभारण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेचे संरक्षक दिनेश चंद्र यांनी केली आहे. कार्यशाळेत कोरण्यात आलेल्या दगडांमध्ये कोट्यवधी रामभक्त आणि संतांच्या भावना जुळल्या असल्याने त्यांचा वापर करण्यात यावा. मंदिर निर्माणासाठी अनेक वर्षे संघर्ष करणाऱ्यांचा ट्रस्टमध्ये समावेश करण्यात यावा. सुरुवातीपासूनच पूजा करण्याचे काम करणाऱ्या निर्माेही आखाड्याने पुढेही पूजा सुरू ठेवावी, असेही ते म्हणाले. सरकारच्या ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांना करावे, असे रामलल्ला यांची बाजू कोर्टात मांडणारे त्रिलोकनाथ पांडेय यांनी सांगितले.
 

बातम्या आणखी आहेत...