आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा कारागृहात दोन कैदांमध्ये हाणामारी, ब्लेडने केले वार; एक कैदी जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जळगाव : जिल्हा कारागृहात शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास कैद्यांना भेटण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांत इंटरकॉमवरील मुलाखतीच्या वेळी कारागृहासमोर हाणामारी झाली. हा वाद वाढत जावून कारागृहातील दोन कैद्यांतही हाणामारी झाली. त्यात एकाच्या छातीवर ब्लेडने वार करून जखमी करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 


जिल्हा कारागृहात असलेल्या बंदिवानांना मुलाखतीसाठी दुपारी ३ ते सायंकाळी ५ अशी वेळ देण्यात आलेली आहे. कलम ३०७ अन्वये कारागृहात असलेला सतीश गायकवाड व तांबापुरा दंगलीच्या गुन्ह्यातील इसाक अहमद शेख हे दाेघे कारागृहात आहे. त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. शनिवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास इसाक याची पत्नी दीपा ही त्याला भेटण्यासाठी कारागृहासमोर आली होती. कारागृहात असलेल्या इंटरकॉमव्दारे नातेवाईक व कैदी यांच्यात संभाषण करून दिले जाते. याचवेळी गायकवाड याची पत्नी व इतर महिलाही संभाषण करण्यासाठी आलेल्या होत्या. नातेवाईक आल्यानंतर इसाक व सतीश यांना कारागृहातील इंटरकॉमवर बोलण्यासाठी आणण्यात आले होते. यावेळी इसाकची पत्नी व सतीश याची पत्नी यांच्यात संभाषणावरून सुरूवातीला शाब्दीक वाद झाला. नंतर हा वाद वाढत जावून महिलांत हाणामारी झाली. त्यानंतर कारागृह पोलिसांनी हा वाद सोडवून त्यांना गेट बाहेर काढले. या प्रकाराने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

 


सतीश गायकवाडने केला हल्ला; इसाक शेखच्या नातेवाइकांचा आराेप 
१ पतीशी बोलण्यासाठी गेलेली असताना सतीशची पत्नी, मेव्हणी व इतर महिलांनी मला मारहाण केली. कारागृहासमोर हा वाद झाला. या मारहाणीनंतर इसाक व गायकवाड यांच्यात कारागृहात वाद झाला. त्यात सतीशने पती इसाकच्या छातीवर ब्लेड मारून जखमी केले. सतीशने मलाही धमकी दिली. माझ्या जखमी पतीला रूग्णालयात घेवून गेले नाही. त्यांना भेटूही दिले नसल्याचा आरोप इसाकची पत्नी दीपाने केला. 
 
२ ब्लेडने जखमी झालेल्या भावासाठी बाहेरून मलमपट्टीचे साहित्य आणून दिल्याचे अल्ताफ शेख याने सांगितले. कारागृहात असलेल्या कैद्यांना इंटरकॉमवर बोलू देण्यासाठी रक्षकांकडून अडवणूक करण्यात येते. कारागृहाच्या कर्मचाऱ्यांकडून नातेवाइकांना पैसे मागण्यात येतात, असा आरोप यावेळी कैद्यांना भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांनीही केला आहे. 


कैद्यांत शाब्दिक चकमक 
इसाक शेख व सतीश गायकवाड या दोन कैद्यांच्या नातेवाईकांत संभाषणावरून कारागृहाबाहेरील झेंड्याजवळ दुपारी ४ वाजेच्या सुमारास वाद झाला. कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी झालेली नाही. त्यांच्यात केवळ शाब्दीक वाद झाला. ब्लेडने मारून जखमी करण्यात आलेले नाही. -अनिल वाढेकर, प्रभारी कारागृह अधीक्षक 
 

बातम्या आणखी आहेत...