आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूबंदीसाेबतच महिलांवरील अन्यायाविरुद्ध लढा : अॅड. पाराेमिता गाेस्वामी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर : 'एल्गारबाई' म्हणूनच त्यांची गावांमध्ये अाेळख... त्या गावात येणार म्हणून महिलांचा घोळका जमलेला असतो.. स्वागताची औपचारिकता पार पडल्यावर तीन-चार महिलांच्या घरी भेट ठरलेली... त्यातून प्रश्नांची माहिती घेतली जाते. गावातील दारूबंदीचे वास्तव आवर्जून जाणून घेतले जाते. प्रचारफेरीत एका ठिकाणी सभेचे आयोजन होते. वन्यप्राण्यांचे हल्ले, त्यापायी जाणारे गावकऱ्यांचे बळी, वन्यप्राण्यांकडून होणारे शेतीचे नुकसान, रोजगार हमीची कामे, जबरान ज्योतधारकांचे प्रश्न, निराधार महिलांचे प्रश्न अशा ज्वलंत प्रश्नांवर आपण काय करणार? हे त्या सांगण्याचा प्रयत्न त्या करतात..

दोन दशकांत चंद्रपूर जिल्ह्यातील गावखेड्यांमध्ये प्रश्नांवर आंदोलनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या एल्गारबाई म्हणजे अॅड. पारोमिता गोस्वामी प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. आम आदमी पार्टीने त्यांना ब्रह्मपुरी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली तालुक्यांत सर्वसामान्य लोकांसाठी राबवल्या गेलेल्या अनेक चळवळीतून गोस्वामी यांची ओळख निर्माण झाली असली तरी चंद्रपूर जिल्ह्यात मागील दहा वर्षांत राबवल्या गेलेल्या दारूबंदी आंदोलनाच्या प्रणेत्या म्हणून त्यांची विशेष अाहे.

'दारूबंदी आंदोलनाच्या नेत्या म्हणून तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात?..' या प्रश्नावर त्या अतिशय सावधपणे बोलतात. 'दारूबंदी आंदोलनाच्या नेत्या' ही अाेळख त्यांना पूर्णपणे मान्य नाही. '२० वर्षांपूर्वी श्रमिक एल्गार संघटनेच्या चळवळीची सुरुवातच गरीब महिला आणि आदिवासींच्या वेगवेगळ्या प्रश्नावरील आंदोलनांनी झाली. त्यात दारूबंदीचे आंदोलन हा एक मोठा भाग होता एवढेच. या आंदोलनाची चर्चा व्यापक झाली. आम्ही दोन दशकांमध्ये जवळपास सर्वच प्रश्न हाताळले. त्यामुळे केवळ दारूबंदी आंदोलनाशी जोडणे हा माझ्यावर अन्याय आहे,' असे त्या सांगतात.

'केवळ दारूबंदीची चर्चा झाली तर इतर महत्त्वाचे प्रश्न दुर्लक्षित होतात. दारूबंदीच्या विषयाशी मला विशेष आस्था अाहेच. कारण दारूने महिलांचे नुकसान केले. अनेक कुटुंब उद‌्ध्वस्त झाली, पण याशिवायही गरीब महिला, आदिवासींचे इतर प्रश्न निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी यावेत,' अशी त्यांची अपेक्षा अाहे.

कठाेर दारूबंदीची गरज
'चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या. पण कोणतेही नेते हा प्रश्न मांडत नाहीत. वन्यप्राण्यांचे हल्ले, त्यापायी होणारे शेतीचे नुकसान, स्थलांतरित मजुरांचे प्रश्न, रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी, मच्छीमार बांधवांचे तलावांवरील हक्क, जबरान ज्योतधारकांना शेतीचे हक्क असे अनेक प्रश्न आम्ही हाताळले. त्यापायी आमच्यावर केसेस लागल्या. आज यापैकी किती प्रश्न मोठ्या राजकीय पक्षांच्या कार्यक्रम पत्रिकेत दिसतात?..' असे अॅड. गाेस्वामी विचारतात. 'दारूबंदीच्या अंमलबजावणीचे काय?..' या प्रश्नावर अॅड. गाेस्वामी सांगतात, 'चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी तर झाली, पण अंमलबजावणी आजही नीट पद्धतीने झालेली नाही. ती कठोरपणे राबवण्याची गरज आहे.'
 

अरविंद केजरीवाल घेणार सभा
ब्रह्मपुरी मतदारसंघात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेचे संदीप गड्डमवार यांच्याशी अॅड. पारोमिता गोस्वामी यांचा सामना अाहे. आहे. आम आदमी पार्टीचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे त्यांची राज्यातील एकमेव जाहीर सभा १८ ऑक्टोबरला ब्रह्मपुरीत घेणार असल्याचे सांगितले जात आहे.