आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नात्यातच फुललेल्या प्रेमसंबंधामधून वाद उफाळताच दोन्ही गटांनी उपसल्या तलवारी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- परस्परांचे नातलग असणाऱ्या दोन कुटुंबांतील दोघांत प्रेमसंबंध फुलले. यावरूनच वाद उफाळला अन् संतापाने बेभान झालेले दोन्ही कुटुंबांतील सदस्य तलवारी उपसून धावून गेले. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जवाहरनगर परिसरात भररस्त्यावर ही घटना घडली. परस्परांवर तुटून पडलेल्या दोन्ही गटांत हाणामारी सुरू असताना त्यातील एक जण मदतीसाठी याचना होता. परंतु इतरांच्या हातातील तलवारी पाहून मध्यस्थी करण्याची कुणाची हिंमतही झाली नाही. या प्रकाराची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी धावत घेतल्याने अनर्थ टळला.

 

याप्रकरणी पोलिसांनी अविनाश धुराजी चिंधे (२८), योगेश धुराजी चिंधे (२५, दोघे रा. शिवाजीनगर) व विश्वास पंढरीनाथ राठोड (रा. कैलासनगर) यांना अटक केली. आरोपी अविनाश नातलगांचा बांधकाम व्यवसाय पाहतो. त्याच्या मावसभावाचे २०१६ मध्ये आजाराने निधन झाले. अविनाशने मदत करून भावजयीला आधार दिला. त्या खासगी नोकरी करत असून त्यांना दोन मुलेही आहेत. काही महिन्यांनंतर अविनाशचे घरी येणे-जाणे वाढले. यातून त्यांच्यात प्रेमसंंबंध निर्माण झाले. परंतु भावजयीच्या मुलांसह दोघांच्या कुटुंबीयांनाही हे नाते कबूल नव्हते. काही महिन्यांपूर्वी दोन्ही कुटुंबांनी दोघांची समजूत घालत नाते संपुष्टात आणण्यास सांगितले. यानंतरही या दोघांत संवाद सुरूच असल्याचा नातलगांचा संशय होता. बुधवारी रात्री दोन्ही कुटुंबात अविनाशच्या कार्यालयासमोर वाद झाला. मोठमोठ्याने शिवीगाळ सुरू होऊन एकमेकांना धमकावणेही सुरू होते. या प्रकाराने धास्तावलेल्या भावजयीने तत्काळ तिचा भाऊ व इतरांना बोलावून घेतले. यामुळे प्रकरण चिघळले अन् काही मिनिटांमध्ये दोन धारदार तलवारी उपसल्या गेल्या. महिलेच्या तक्रारीनुसार, तिचा मुलगा व ती कार्यालयासमोर असताना अविनाश व याेगेश तिथे आले. त्यांनी कारमधून तलवारी काढल्या, तर अविनाशच्या तक्रारीवरून भांडण झाल्याचे समजताच तो घरून घटनास्थळी धावला. तेथे महिलेचा मुलगा व गोटूच्या हातात तलवारी होत्या. त्यांनी तलवार उगारताच तो खाली पडला. त्यांनी तलवारीची म्यान, चामडी पट्ट्याने मारहाण केली. योगेशलाही तलवारीच्या म्यानेने मारहाण करण्यात आली. अविनाश मोठमोठ्याने मदतीसाठी याचना करत होता, परंतु आरोपींच्या हातात तलवारी असल्याने कोणीही मदतीसाठी धजावले नाही. जवाहरनगर पोलिसांनी दोन तलवारीसह चिंधे बंधू आणि महिलेच्या भावाला ताब्यात घेतले. परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलवारी नेमक्या कोणी आणल्या याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

यंदा निवडणुकांचे वर्ष; रस्त्यांवरच सुरू आहेत वाढदिवसांचे सोहळे 
निवडणुकांचे वेध लागल्याने सध्या सर्वत्र चिल्लर कार्यकर्त्याचे वाढदिवसही भररस्त्यावर दिमाखात साजरे केले जात आहेत. मध्यरात्री बारा वाजता मोठमोठ्याने ओरडत, रस्ते अडवून केक कापले जातात. काही परिसरात रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना अडवल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यातील काही जण चाकू, तलवारीने केक कापत धाक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

 

अमितेशकुमार यांचा वचक होता 
दोन ते तीन महिन्यांत काही तरुण किंवा गट रस्त्यावर तलवारी घेऊन उतरल्याच्या चार ते पाच घटना समोर आल्या आहेत. तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या कार्यकाळात अशा तलवारींचे शौकीन असलेले तरुण व गुंडांवर चांगलाच वचक होता. मागील महिन्यांपासून उघडउघड तलवारी बाळगल्याची प्रकरणे समोर येत आहेत. 

 

...म्हणे तो अल्पवयीन 
गत महिन्याभरात रामनगर, मुकुंदवाडी व कॅनॉट परिसरात तलवारीने केक कापल्याचे प्रकार समोर आले आहेत. यात मुकुंदवाडी भागात एका राजकीय कार्यकर्त्याचा समावेश आहे. रामनगरातील एका तरुणानेही असाच प्रकार केला. माहिती मिळताच गुन्हे शाखेने तरुण विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. परंतु अल्पवयीन असल्याने तसेच त्याने चूक मान्य करत आयुष्यात वाढदिवसच साजरा करणार नाही, असे सांगताच पोलिसांनी त्याला समज देऊन सोडून दिले. अशाच एका प्रकरणात एका राजकीय नेत्याने तलवारीने केक कापणाऱ्या कार्यकर्त्याला सोडण्यासाठी पोलिसांना फोनही केला. पोलिसांनी त्याला समज देत नोटीसही बजावली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...