आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रफाल प्रकरण : भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करा; काँग्रेसची सीव्हीसीकडे मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- रफाल लढाऊ विमान करार प्रकरणात झालेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी केंद्रीय सतर्कता आयुक्तांकडे (सीव्हीसी) केली. पक्षाच्या शिष्टमंडळाने अलीकडेच महालेखापालांची भेट घेऊन रफाल खरेदी करारातील कथित अनियमिततेवर अहवाल तयार करून तो संसदेत सादर करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर सोमवारी शिष्टमंडळाने सीव्हीसी के. सी. चौधरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात गुलाम नबी आझाद, अहमद पटेल, आनंद शर्मा, कपिल सिब्बल, रणदीरसिंह सुरजेवाला, जयराम रमेश, अभिषेक मनू सिंघवी, मनीष तिवारी, विवेक तनखा, प्रमोद तिवारी आणि प्रणव झा यांचा समावेश होता. 


सरकारकडे विविध प्रश्नांची उत्तरेच नाहीत 
या करारावर उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे सरकारकडे नाहीत. उलट प्रकारे संपूर्ण प्रक्रिया का घडली याचे उत्तर कोणीही देत नाही. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या कंपनीला ३० हजार रुपयांचे कंत्राट का दिले होते? सरकार एचएएलला बाजूला कसे सारू शकते? 
- अभिषेक मनू सिंघवी, ज्येष्ठ नेते, काँग्रेस 


निवेदनात मागणी : सीव्हीसीने त्वरित हस्तक्षेप करावा 
काही 'उद्योजक' मित्रांना लाभ मिळ‌वून देण्यासाठी सरकारी तिजोरीला मोठा फटका बसवण्यात आला तसेच सरकारी मालकीच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या संस्थेला बाजूला सारून राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका निर्माण करण्यात आला, असा आरोप करून निवेदनात म्हटले आहे की, रफाल घोटाळा आता भारतातील सर्वात मोठा संरक्षण घोटाळा म्हणून समोर आला आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत असून संरक्षण मंत्रालय त्यावर काहीही उत्तरे देत नाही. त्यामुळे आता केंद्रीय सतर्कता आयोगानेच या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करणे गरजेचे आहे.

 
फायली, कागदपत्रे सील करा, गुन्हा नोंदवा 
हा शतकातील 'सर्वात मोठा घोटाळा' आहे. करारावरील निर्णय पंतप्रधानांनी घेतला होता. मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीला त्याबाबत काहीही सांगण्यात आले नाही. सर्व फायली आणि कागदपत्रे सील करावी आणि गुन्हा दाखल करावा, अशी माहणी आम्ही केली.

- आनंद शर्मा, राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते 


माजी राष्ट्राध्यक्ष ओलांद यांचे स्पष्टीकरणे पुरेसे 
रफाल करार प्रकरणात फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रँकॉइस ओलांद यांनी 'स्पष्टीकरण' दिले आहे. त्यामुळे आता संशयाला काहीही जागा नाही, लोकसभेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून काँग्रेस या प्रकरणात राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधकांकडे मुद्दाच नाही, त्यामुळे ते रफाल कराराचा मुद्दा मांडत आहेत.

- राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री 


राहुल गांधींचा अमेठीत मोदींवर नव्याने हल्लाबोल 
अमेठी | काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी पुन्हा रफाल प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. अमेठीतील एका बैठकीत राहुल म्हणाले की, देशाच्या 'चौकीदाराने' गरिबांच्या, शहिदांच्या आणि जवानांच्या खिशातून २० हजार कोटी रुपये नेले आणि ते उद्योगपती अनिल अंबानी यांच्या खिशात घातले. रफालची किंमत उघड का केली जात नाही आणि अंबानींना कंत्राट कसे देण्यात आले या प्रश्नांची उत्तरे पंतप्रधानांनी द्यावीत, अशी मागणीही त्यांनी केली. 

बातम्या आणखी आहेत...