कोल्हापूर - साडेतीन वर्षे एकसंघ असलेल्या कोल्हापूर येथील टोलविरोधी कृती समितीमधून अखेर महायुती बाहेर पडली असून महायुतीच्या वतीने सवतासुभा मांडण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. टोलप्रश्नी आता महायुती 18 फेब्रुवारी रोजी स्वतंत्रपणे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
साडेतीन वर्षांपासून टोलविरोधी कृती समितीच्या झेंड्याखाली येथे टोलविरोधी आंदोलन उभारण्यात आले. मात्र, लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजायला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येकाची चाल वेगवेगळी दिसायला सुरुवात झाली. यातूनच आता लोकसभेसाठी एकत्र आलेल्या पाच पक्षांच्या महायुतीने टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली असून त्याअंतर्गतचा पहिला मोर्चा 18 फेब्रुवारीला कोल्हापुरात काढण्यात येणार आहे.
गेल्या चार महिन्यांपासून आमदार क्षीरसागर हे स्वतंत्र आंदोलनासाठी उत्सुक होते. केवळ निवेदने देऊन काहीही होणार नाही. मंत्री आणि अधिकारी आपल्याला फसवत असल्याची भावना त्यांनी याआधीच व्यक्त केली होती. अशातच महायुतीने हा निर्णय घेतल्याने महायुती यासाठी स्वतंत्र आंदोलन उभारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.