आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Finally, Shiv Sena BJP And Allies Declare , But The Formula For Sharing Is Still Unknown

युतीची घाेषणा; आदित्य ठाकरेंनी स्वत:चीच उमेदवारी केली जाहीर; जागावाटप फाॅर्म्युला गुलदस्त्यातच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली शिवसेना, भाजपसह इतर मित्रपक्षांचा समावेश असलेल्या महायुतीची अधिकृत घाेषणा साेमवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व शिवसेना नेते सुुभाष देसाई यांची स्वाक्षरी असलेल्या संयुक्त पत्रकाद्वारे करण्यात आली. युतीच्या जागावाटपाचा फाॅर्म्युला मात्र अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही. दुसरीकडे, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपण या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घाेषणा स्वत:च केली. शिवसेना पक्षप्रमुख मात्र या वेळी उपस्थित नव्हते.

वरळीतील विजय संकल्प मेळाव्यास रश्मी ठाकरे, मनोहर जोशी आणि खासदार संजय राऊत उपस्थित होते. आदित्य म्हणाले, ‘हीच वेळ आहे नवा महाराष्ट्र घडवण्याची. गेले दोन-तीन महिने मी महाराष्ट्रभर फिरत होतो. मतदारांचे आशीर्वाद घेत होतो. गेली ५० वर्षे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जे तुम्ही प्रेम दिले तेच प्रेम तुम्ही मला देणार आहात. हेच प्रेम मी पुढे घेऊन जाणार आहे. मला जेव्हा जेव्हा कोणी विचारले की तू काय करू शकतोस, मी त्यांना उत्तर दिले की, मी राजकारण करू शकतो. मी आता पक्षप्रमुखांची परवानगी घेतली आहे, पण आपल्या सर्वांची जर परवानगी असेल आणि सर्व नेत्यांची इच्छा असेल तर मी ही निवडणूक लढवणार असे जाहीर करतो.’ खासदार संजय राऊत यांनी या वेळी आदित्य ठाकरे यांना सूर्ययानाची उपमा दिली. ‘निवडणुकीनंतर हे सूर्ययान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरेल,’ असे सांगत त्यांनी मुख्यमंत्रिपदाचे संकेत दिले.

महायुती : जागावाटप फाॅर्म्युला गुलदस्त्यातच
राज्यात गेली ५ वर्षे राज्यकारभार करीत महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्याचे काम महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात केले आहे. आता हाेणारी विधानसभा निवडणूकही भाजप, शिवसेना, रिपाइं, रासप, शिवसंग्राम व रयत क्रांती हे पक्ष महायुतीनेच लढतील. जागावाटपाचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल, असे युतीच्या संयुक्त पत्रकात म्हटले आहे. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या या पत्रकावर सह्या आहेत.
 

आदित्यचा विराेधक काेण ?
आदित्य यांच्या रूपाने ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणूक लढवत आहे. बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे निवडणुकांपासून दूरच राहिले हाेते. बाळासाहेब ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबीयांतील कोणीही कधीही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही. आम्हाला पदाची अपेक्षा नाही, असे पूर्वी म्हटले हाेते. मात्र त्यांचा नातू निवडणूक लढवत आहे. त्यांच्याविराेधात आता विराेधक काेणता तगडा उमेदवार देतात याकडे राज्याचे लक्ष आहे. वरळी मतदारसंघात सध्या शिवसेनेचा आमदार आहे.
 

यापूर्वीही पत्रकातूनच ताेडली हाेती युती : 
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झालेली शिवसेना-भाजपची युती १९९२ मध्ये मुंबई मनपा निवडणुकीत तुटली हाेती. तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे व भाजपचे नेते प्रमाेद महाजन यांच्या सहीचे एक संयुक्त पत्रक काढून दाेन्ही पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले हाेते. २०१४ मध्ये मात्र भाजपने पत्रकार परिषद घेऊन युती तुटल्याची घाेषणा केली. तर आता पुन्हा दाेन्ही पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त पत्रक काढून महायुतीवर शिक्कामाेर्तब केले.
 

नमिता मुंदडा भाजपत : 
माजी मंत्री विमलताई मुंदडा यांच्या स्नुषा नमिता यांनी साेमवारी भाजपत प्रवेश केला. शरद पवार यांनी नमिता यांना केजमधून राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर केली हाेती, मात्र ती धुडकावून नमितांनी कमळ हाती घेतले. आता त्या केजमधून भाजपच्या उमेदवार असतील. दुसरीकडे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना सेनेने बीडमधून एबी फाॅर्म दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...