आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर भाजपने जात दाखवली, मागच्या दाराने मनुस्मृती लादण्याचा कट उघड; गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची भाजपसह संघावर जाेरदार टीका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड शहरामध्ये आयाेजित संविधान बचाव महासभेत बाेलताना राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड. - Divya Marathi
बीड शहरामध्ये आयाेजित संविधान बचाव महासभेत बाेलताना राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड.

बीड : देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जातव्यवस्थेने ९५ टक्के लाेकांचे पाणवठे, देवस्थाने तसेच स्मशानभूमीदेखील हिरावून घेतली. कधीच कुठे स्थिरता मिळाली नाही. आता रहिवासी दाखले (कागद पुरावे) हेच सरकार मागत आहे. आरएसएसप्रणीत भाजप सरकारने एनआरसी, सीएए आणि एनपीआर असे कायदे पुढे करत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे न्याय, समता, बंधुतेचे अधिकार देणारे संविधान बाजूला करून मनुस्मृती मागच्या दाराने लादण्याचा कट रचला आणि ताे उघडकीस आला आहे. धर्मनिरपेक्ष देशामध्ये अखेर भाजपने स्वत:ची जात दाखवली, अशी टीका करत संविधान वाचवण्यासाठी जाती-धर्माच्या भिंती साेडून महात्मा गांधीजींच्या विचाराने अहिंसेची लढाई लढण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.

बीड जिल्हा संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल येथे बुधवारी संविधान बचाव महासभा आयाेजित केली. या वेळी गृहनिर्माणमंत्री आव्हाड बाेलत हाेते. व्यासपीठावर मुस्लिम पर्सनल लाॅ बाेर्ड सदस्य माैलाना अबू तालीब रहमानी, आ. संदीप क्षीरसागर, माजी न्यायमूर्ती बी.जी. काेळसे पाटील, सिस्ता सेटलवाड, गीतसिता धर, माजी आमदार, पृथ्वीराज साठे, राजेंद्र जगताप, माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार सिराज देशमुख, माजी आमदार सुनील धांडे, उषाताई दराडे, सुशीला मोराळे, नामदेव चव्हाण, मोहन जाधव, मोईन मास्टर, जाकीर मौलाना, फारूक पटेल, शेख शफिक, खुर्शीद आलम आदी उपस्थित हाेते.

गृहनिर्माणमंत्री आव्हाड म्हणाले, भारत देशात राहायचे असेल तर हिंदुत्व स्वीकारावे लागेल, अन्यथा दुय्यम स्थान मिळेल, असे गाेळवलकर यांनी देशाला स्वातंत्र्यापूर्वी लिहून ठेवले आहे. मात्र डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधानातून प्रत्येक नागरिकाला न्याय, समता, बंधुतेचा अधिकार मिळवून दिला आहे. आता आरएसएस आणि भाजपकडून पुन्हा गाेळवलकर यांची विचारधारा देशावर थाेपण्याचा कट रचला जात आहे.

लाेकनेते मुंडे साहेबांविना बीड जिल्हा पाेरका झाला

ज्यांना मी मनातल्या मनात माझा नेता मानताे, आज ते जिवंत असते तर ही सभा त्यांच्या नेतृत्वाखाली झाली असती. त्यांनी भाजपचे विचार झुगारून दिले असते आणि इथल्या बहुजनांसाठी ताे माणूस या व्यासपीठावर दिसला असता, त्या माणसांचे नाव लाेकनेते गाेपीनाथराव मुंडे असे आहे. मी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताे. ते आज नाहीत हे प्रकर्षाने जाणवते. ते असते तर बहुजनच काय, मुस्लिम बांधवांनादेखील माेठा आधार मिळाला असता, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाषणानंतर मत व्यक्त केले. यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

बातम्या आणखी आहेत...