आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर मनसेचं इंजिन सुरू झालं

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाही नाही म्हणत अखेर मनसेचं इंजिन सुरू झालं. त्याला कुणी 'ढकल-स्टार्ट' म्हटलं तरी हरकत नाही. अल्पशा तयारीत मनसे या वेळी १०४ जागा लढतेय. मनसेची ही तिसरी विधानसभा निवडणूक आहे. २००६ मध्ये मनसेची स्थापना झाली. २००९ च्या पहिल्या खेपेला १३ आमदार निवडून आले. २०१४ मध्ये १५३ जागा लढवल्या. त्यातला एकच जिंकला. या खेपेला १०४ उमेदवार दिले आहेत. पहिल्या दोन खेपांना मनसे जोशात होती. आता तो राहिला नाही. राज यांच्या देहबोलीतून ते जाणवत आहे. पहिल्या दोन्ही खेपांना सत्तेत जाण्याच्या वल्गना होत्या. त्यासाठी मतं मागितली होती. या वेळी मनसे विरोधी बाकावर बसायचे म्हणते. मुंबईत मनसेच्या प्रचाराचा परवा नारळ फुटला. पहिल्याच सभेत राजनी विरोधात बसायची घोषणा केली. विरोधात बसायचे म्हणता. मग, मते कशाला मागता, अशी ओरड सुरू झाली. राजचा आत्मविश्वास हरवलाय, मनसे या वेळी बॅकफूटवर आहे, अशा चर्चांना ऊत आला. त्यात तथ्य असेलही. खरं म्हणजे, राजच्या काही ठाम भूमिका आहेत. विकासाच्या स्वतंत्र कल्पना आहेत. जे पटेल तेच बोलणारा, अशी त्यांची प्रतिमा आहे. विरोधात बसायची केलेली भाषा मनसेच्या प्रकृतिधर्माला साजेल अशीच आहे. वास्तवाचे भान आल्याचाही तो पुरावा आहे. भारतीय राजकारणात आज विरोधकांची जागा संकोचत नेली जात आहे. सुदृढ लोकशाहीसाठी सक्षम विरोधक हवा, असे आपण म्हणतो आहोत. राष्ट्रवादी अन् काँग्रेस हे विरोधकांची भूमिका नीट वठवत नाहीत, असा आपला आरोप होता. मग, विरोधात बसण्याच्या राजच्या घोषणेचा वेगळा अन्वयार्थ का निघावा? मनसे आज संपल्यात जमा आहे. हे खरं आहे. नाशिक महापालिकेतली सत्ता गेली. मुंबई, ठाणे महापालिकेत नगरसेवकांची संख्या एक-दोनवर आली. विधिमंडळात एकच आमदार उरला. पण, 'संपले संपले' म्हणणाऱ्या राजकीय पक्षांनी भारतीय राजकारणात गरुडझेप घेतल्याचे अनेक दाखले इतिहासात आहेत. मधल्या काळात राज दोन वर्षे सक्रिय नव्हते. त्यात हा पक्ष म्हणजे एकखांबी तंबू. एक नेता, बाकी सगळे शिपाई. आता मनसेने एक तप पूर्ण केलंय. राजकारणाची कूस बदलायला वेळ लागत नसतो. त्यामुळे विरोधी पक्षात बसण्याची घोषणा म्हणजे मनसे संपली आहे, असे म्हणता येणार नाही. राजकडे जो करिष्मा आहे, तो राज्यात एकाही नेत्याकडे नाही. कार्यकर्ते टिकवता न येणे ही मनसेची कमजाेरी आहे. ती दूर केली, तर भविष्यात मनसेला संधी आहे. विरोधी बाकांवर बसण्याच्या राजच्या प्रामाणिक घोषणेचे लोकशाहीप्रेमींनी स्वागत करायला हवे. अर्थात, मोदी-शहांना सत्तेच्या पटलावरून हाकला म्हणणारे राज आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जागा घेऊ पाहत असतील, तर भाजप-शिवसेनेसाठी ती आनंदवार्ताच ठरेल.  

बातम्या आणखी आहेत...