आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Finally, The Ousting Of Rebel Minister Om Prakash Rajbhar From The Uttar Pradesh Cabinet

अखेर कारवाई : उत्तर प्रदेश मंत्रिमंडळातून बंडखोर मंत्री ओमप्रकाश राजभर यांची हकालपट्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (सुभासप) अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांची उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातून सोमवारी हकालपट्टी करण्यात आली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शिफारशीवरून राज्यपाल राम नाईक यांनी राजभर यांना मंत्रिपदावरून मुक्त केले आहे. राजभवनच्या प्रवक्त्याने सांगितले की, ओमप्रकाश राजभर यांना तत्काळ प्रभावाद्वारे राज्य मंत्रिमंडळाच्या सदस्यत्वातून तत्काळ प्रभावाने पदमुक्त करण्यात आले आहे. 


ओमप्रकाश राजभर हे योगी सरकारमध्ये मागास वर्ग कल्याण आणि दिव्यांग जन विकास मंत्री होते. त्यांच्या पक्षाचे चार आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावरून त्यांचे भाजपशी मतभेद झाले होते. त्यामुळे त्यांनी भाजपची साथ सोडत स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. त्याआधीही मागासवर्गीयांच्या मुद्द्यांवरून राजभर योगी सरकारवर सातत्याने टीका करत होते. त्यांच्या काही सहकाऱ्यांची विविध मंडळांवर नियुक्ती झाली होती. त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा होता. त्यांचा हा दर्जाही काढून घेण्यात आला आहे.


राजभर यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान आपल्या पक्षाला राज्यात पाच ते सहा जागा द्याव्यात अशी मागणी भाजपकडे केली होती, पण भाजपने त्याला नकार दिला होता. तुम्हाला घोसी मतदारसंघ देता येईल, पण भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल, असे त्यांना सांगण्यात आले होते. पण राजभर यांनी नाराज होत या प्रस्तावाला नकार दिला होता. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघासह ३९ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. निवडणुकीदरम्यान सुहेलदेव भारतीय समाज पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या रोड शोमध्येही भाग घेतला होता.


उशिरा घेतलेला निर्णय : राजभर
गाझीपूर । भाजपच्या वाराणसी प्रांताचे विभागीय अध्यक्ष राजेश राजभर यांनी ओमप्रकाश राजभर यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीचे स्वागत केले. योगी सरकारने उशिरा का होईना, पण योग्य निर्णय घेतला आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली. राजेश राजभर म्हणाले की, ओमप्रकाश राजभर हे महाराज सुहेलदेव यांचे नाव घेऊन समाजाला फसवण्याचे काम करत आले आहेत. भाजपने महाराज सुहेलदेव यांना योग्य तो सन्मान देण्याचे काम केले. तरीही ओमप्रकाश राजभर भाजपला अडचणीत आणत होते. ते विरोधकांच्या तंबूत बसून समाजाच्या विरोधात काम करत होते. ओमप्रकाश यांनी सर्व पक्षांत जाऊन राजकारण केले. त्यानंतर त्यांनी भाजपशी आघाडी केली. भाजपने त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. पण आपल्या नेहमीच्या सवयीनुसार राजभर यांनी फक्त आपल्या कुटुंबाचाच फायदा करत समाजाला सातत्याने धोका देण्याचे काम केले आहे.

 

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत : राजभर यांची प्रतिक्रिया
ओमप्रकाश राजभर यांनी माध्यमांशी बोलताना या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून माझी हकालपट्टी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी उशिरा हा निर्णय घेतला आहे. त्यांनी २० दिवसांआधीच हा निर्णय घेतला असता तर बरे झाले असते. दुसरीकडे सुभासपचे नेते प्रभाकर जयस्वाल म्हणाले की, ओमप्रकाश राजभर यांनी एक महिन्यापूर्वीच मुख्यमंत्री कार्यालयाकडे आपला राजीनामा दिला होता. आज झालेली त्यांची हकालपट्टी म्हणजे फक्त राजकीय नौटंकी आहे. लोकसभा निवडणुकीतील आपल्या संभाव्य पराभवामुळे चिडून जाऊन भाजप नेत्यांनी ही कारवाई केली आहे.

बातम्या आणखी आहेत...