आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला अर्थमंत्र्यांकडून १५१ कोटींची सुवर्ण जयंती भेट 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त १५१ कोटी रुपये देण्याची घोषणा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दीक्षांत भाषणात केली. कृषी विद्यापीठाचा ३३ वा दीक्षांत सोहळा मंगळवारी विद्यापीठाच्या सभागृहात झाला. कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती चंद्रकांत पाटील, राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे, राणी लक्ष्मीबाई कृषी विद्यापीठ झाशीचे कुलगुरू प्रा. अरविंदकुमार, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू व्यासपीठावर होते. 


१५१ कोटी रुपयांपैकी ५० टक्के राशी संशोधन कार्यावर खर्च करा. त्यातून शेतकऱ्यांना चांगले दिवस दिसतील, अशी अपेक्षा व्यक्त करुन शेती मजबुरीतून मजबुतीकडे जाण्यासाठी कृषी पदवीधर महत्वाची भूमिका बजावू शकतात, असे सांगून मुनगंटीवार यांनी कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेण्याचे आवाहन केले. 


'देव डोलतो उंच पिकातून, देव बोलतो बाल मुखातून' या गीताच्या आेळी उदधृत करताना वित्तमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पादन, उत्पन्न वाढीसाठी पदवीचा उपयोग करायचा आहे. १ ग्रॅम बियाणे जमिनीत टाकले तर १०० ग्रॅम परत करण्याची किमचा धरतीमाता साधू शकते. आम्ही कृत्रिम चंद्र, दुसरी पृथ्वी निर्माण करू शकू परंतु मशीनमधून धान, गहू, तांदूळ निघाले असे होणार नाही. 


शेतकरी, राजकीय नेता कोणी होणार की नाही ?

दीक्षांत भाषणात सुधीर मुनगंटीवार म्हणाले, गतकाळात ३५०० विद्यार्थ्यांचा आपण गौरव केला. त्यापैकी प्रत्येकाने पुढे आयएएस, आयपीएस, पायलट होईल असे सांगितले. कोणीही शेतकरी, राजकीय नेता होण्याची इच्छा व्यक्त केली नाही. अशाने कसे होईल. शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवण्याची ताकद कृषी शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यांनी त्याचा योग्य वापर केल्यास सर्वांचे भले होईल, असा विश्वास व्यक्त केला. विविध शाखांतील पदवीधर, आचार्य पदव्या चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. पदवी प्राप्त करणाऱ्यांत मुलींचा टक्का अधिक होता. 


स्वागतपर भाषणात विद्यापीठाच्या आजवरच्या प्रगतीवर कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी प्रकाश टाकला. विविध पिकांच्या वाणासोबतच १३७६ विकसित तंत्रज्ञान उपलब्ध करुन दिले आहे. 
यामध्ये विविध पिकांच्या १६९ वाणांचा समावेश आहे. २३ शेती अवजारेसुद्धा विकसीत केली आहेत. महाबीजच्या समन्वयाने पीकेव्ही एमएचवाय संकरित २, बीजी २ वाणाची निर्मिती केली असून त्यांना मान्यता मिळाली आहे. शेततळ्यामुळे विद्यापीठाची ५०० हे. जमीन सिंचनाखाली आली आहे. सौर ऊर्जेवरील जनरेटरचा वापर, तसेच इन्क्युबेटर सेंटर राबवणारे हे राज्यातील एकमेव विद्यापीठ ठरले आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या समस्या निराकरणासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे, असे कुलगुरू डॉ. भाले म्हणाले. शारदास्तवन, विद्यापीठ गीत सुरुवातीला झाले. माजी कुलगुरू, लोकप्रतिनिधी, विद्यापीठाचे विभाग प्रमुख व्यासपीठावर होते. 


५० टक्के रक्कम संशोधन कार्यावर खर्च करण्याचे निर्देश 
पद जाये पर निधी न जाये 

विद्यापीठाच्या विकासासाठी १५१ कोटी रुपये देण्याचे जाहीर करणे हे राजकीय नेत्याचे आश्वासन नाही तर दिलेला शब्द पूर्ण करेन. पद जाये पर निधी ना जाये, या शब्दात मुनगंटीवार यांनी बांधिलकी सांगितली. खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर यांनी १०० कोटी रुपयांची मागणी केली होती परंतु आपण त्यापेक्षा अधिक राशी देत आहोत, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

 

बातम्या आणखी आहेत...