आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघ गुरगुरला म्हणून त्याला सोडायचे नसते त्याचे संवर्धन करायचे असते; अर्थमंत्री मुनगंटीवारांचे सेनेला प्रत्युत्तर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - ‘युतीचे संबंध चांगले राहावे, असेच माझे प्रयत्न राहिले आहेत. मी वनमंत्री आहे. त्यामुळे वाघ गुरगुरला म्हणून त्याला सोडायचे नसते तर त्याचे संवर्धन करायचे असते’ अशा शब्दांत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले. ‘सरकार वेळेत स्थापन होणार नसेल तर संविधानातील तरतुदीनुसार काय होऊ शकते, ही माहिती देणे म्हणजे धमकी कशी काय ठरू शकते?’, असा प्रश्नही त्यांनी केला.

सरकार वेळेवर स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू शकते, या मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर शिवसेना संतप्त झाली आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून त्यांच्यावर कठोर टीकाही करण्यात आली. याबाबत विचारले असता मुनगंटीवार यांनी सांगितले की, राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा मी स्वत:हून मांडलेला नव्हता. 

मला प्रश्न विचारण्यात आला. त्याचे उत्तर मी दिले. सरकार वेळेवर स्थापन न झाल्यास काय होणार, या प्रश्नावर मी संविधानातील राष्ट्रपती राजवटीची तरतूद सांगितले. ही माहिती देणे धमकी कशी काय होऊ शकते? असा प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नावरील शिक्षकाचे उत्तर धमकी ठरू शकते काय, असेही मुनगंटीवार म्हणाले. मला आश्चर्य वाटते. असे अग्रलेख लिहिण्यापेक्षा आम्ही पाच वर्षात कोणतेही भाष्य केले नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आम्ही युती रहावी, यासाठीच प्रयत्न केले.  माझी भूमिका ही नेहमी युतीचे संबंध चांगले राहावे अशीच राहिली आहे, असेही मुनगंटीवर यांनी या वेळी सांगितले. मी वनमंत्री आहे. वाघांचे संवर्धन हे माझे काम आहे. वाघ गुरगुरला म्हणजे त्याला सोडायचे नसते तर त्याचे संवर्धन, संरक्षण करायचे असते, या शब्दात मुनगंटीवार यांनी शिवसेनेच्या टीकेचा समाचार घेतला.  मुख्यमंत्री महायुतीचाच होणार, असेही ते म्हणाले.
 
 

बातम्या आणखी आहेत...